हुतात्मा राजगुरु यांची प्रेरणादायी वास्तू विद्युत रोषणाईने उजळली

हुतात्मा राजगुरु यांची प्रेरणादायी वास्तू विद्युत रोषणाईने उजळली

· राज्य संरक्षित स्मारक मौजे खेडला जयंती दिनानिमित्त विशेष सजावट
        मुंबई, दि.27 : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील मौजे-खेड (राजगुरुनगर) येथे त्यांचे जन्मस्थळ असलेली वास्तु राज्य संरक्षित स्मारक म्हणून सन 2000 मध्ये घोषित करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेली वास्तू येथे विद्युत रोषणाई तर थोरला वाड्यावर फुलांची आणि रांगोळीची विशेष सजावट करण्यात आली.

        देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या राज्यातील इतरही हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांच्या निस्सिम देशभक्तीचा नवीन पिढीस परिचय करुन देण्याच्या दृष्टीने त्यांची  निवासस्थाने/स्मृतीस्थळे इत्यादींना सुशोभित करणे, त्यांची माहिती प्रसिध्द करणे, त्यांना भेटी देऊन कृतज्ञता व्यक्त करणे, असे उपक्रम “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करतांना हाती घेण्यात येत आहेत.    

        हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या गावी 24 ऑगस्ट 1908 रोजी झाला. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि आधी नाशिक आणि नंतर काशी शहरात शिक्षणासाठी  पोहचले. काही काळानंतर चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरुंशी परिचय झाला आणि त्यांनतर आझाद यांनी राजगुरुंना क्रांतीकारकांच्या गटात घेतले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येय्याने प्रेरित झालेले राजगुरु, भगतसिंह आणि सुखदेव हे तिघे फाशीला सामोरे गेले.
सामाजिक दायित्व योजनेतून स्मारकाची स्वच्छता, देखभाल
        सामाजिक दायित्व योजनेतून हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाची स्वच्छता, देखभाल आणि परिरक्षण करण्यात येणार आहे. 11 महिन्यांच्या कालावधीकरिता या स्मारकाच्या ठिकाणी 2 पहारेकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पत्रकार दत्ता जोरकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन सांडभोर आणि आशिष सांडभोर यांनी राजगुरु यांच्या स्मारकाची स्वच्छता, देखभाल आणि परिरक्षण करण्याकरिता पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यासमवेत सामंजस्य करार करुन 2 पहारेकरी स्वखर्चाने नेमले आहेत.

        यापूर्वी सिंहगड, तोरणा, विशाळगड, भुदरगड, राजगड किल्ला याबरोबरच छत्रपती राजाराम महाराज समाधीस्थळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, महात्मा फुले वाडा, महादेव मंदिर, तुळापूर, नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ या सर्व राज्य संरक्षित स्मारकांवर एकूण 27 पहारेकरी विविध संस्थेच्या तसेच लोकांच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत.या पहारेकऱ्यांकडून रोज स्मारकांवरील मंदिरे, समाधी, इतर वास्तू आणि परिसराची स्वच्छता, देखभाल व परिरक्षण केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: