हनुमान जयंती आणि मारुतीची उपासना

हनुमान जयंती आणि मारुतीची उपासना
Worship of Hanuman Jayanti and Maruti upasana
 लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा देव म्हणजे ‘मारुति’ ! मारुतीचे दुसरे सर्वपरिचित नाव आहे, हनुमान. शक्‍ती, भक्‍ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन रहाणार्‍या मारुतीच्या जन्माचा इतिहास, हनुमान जयंती पूजाविधी आणि मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया. हनुमान जयंतीला अन्य दिवसांच्या तुलनेत १ सहस्रपटीने मारुतितत्त्व कार्यरत असते. त्याचा लाभ घेण्यासाठी त्या दिवशी मारुतीचा  ‘श्री हनुमते नम: ।’ हा जप अधिकाधिक करावा. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी हा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. प्रस्तुत लेखात कोरोनाच्या संकटकाळा तील निर्बंधांमध्येही हनुमान जयंती कशी साजरी करू शकतो हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. हनुमान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर बलोपासनेसह भगवंताची भक्ती करण्याचा संकल्प करूया !

१. जन्माचा इतिहास :

राजा दशरथाने पुत्रप्राप्ती साठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला. तेव्हा यज्ञातून अग्निदेव प्रगट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) प्रदान केला होता.दशरथाच्या राण्यां प्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमान जयंती’ म्हणून साजरा करतात.

२. मारुतीला ‘हनुमान’ हे नाव कसे पडले ? :

वाल्मीकिरामायणात (किष्किंधाकांड, सर्ग ६६) याविषयी माहिती आहे – अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर ‘उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्व फळ असावे’, या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला ‘हनुमान’ हे नाव पडले.

३. हनुमान जयंती पूजाविधी :

हनुमंताचा जन्मोत्सव प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळी साजरा करतात. हनुमंताच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे. सूर्योदयाच्या वेळी शंखनाद करून पूजनाला प्रारंभ करावा.नैवेद्याला सुंठवडा (सुंठीचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवू शकतो. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा. हनुमानासाठी रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार करावा. पूजनानंतर श्रीरामाची आणि हनुमंताची आरती करावी.

४. मारुतीच्या उपासनेअंतर्गत करायच्या कृती :

मारुतीला शेंदूर,रुईची पाने,फुले वहाणे आणि प्रदक्षिणा घालणे – शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल यांमध्ये हनुमानाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण कराव्यात. हनुमानाला फुले वहातांना पृथ्वी,आप,तेज,वायु आणि आकाश या पंचतत्त्वांवर हनुमानाचे अधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून, ती पाच किंवा पाचच्या पटीत वाहावीत. याप्रमाणेच हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायच्या असल्यास, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत, म्हणजे दहा, पंधरा, वीस अशा घालाव्यात.

मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत

हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. या वेळी हनुमानाची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत, यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा.

आध्यात्मिक त्रास आणि ग्रहपीडा निवारणार्थ मारुतीची उपासना

ग्रहपीडा,शनीची साडेसाती दूर करण्यासाठीही हनुमानाची उपासना सांगितली आहे.आसुरी शक्‍तींपासून,आध्यात्मिक त्रासापासून रक्षण होण्यासाठी केलेली हनुमानाची उपासनाही विशेष फलदायी ठरते.

नामजप आणि स्तोत्रपठण

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते.त्याचा लाभ घेण्या साठी त्या दिवशी मारुतीचा ‘श्री हनुमते नम:।’ हा जप अधिकाधिक करावा. समर्थ रामदासस्वामींनी रचलेले मारुतिस्तोत्र (भीमरूपीस्तोत्र) यात विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती केली आहे. नियमित स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्‍तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षककवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्‍तीं पासून रक्षण होते. मारुतीची (हनुमंताची) आरतीही समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.

प्रार्थना : हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करूया की, हे मारुतिराया, तू जशी श्रीरामचंद्राची भक्ती केलीस, तशी भक्ती मलाही करण्यास शिकव. धर्मरक्षणा साठी मला भक्ती आणि शक्ती दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

५. कोरोना काळातील निर्बंधांच्या वेळी हनुमान जयंती अशी साजरी करा

अनेक भाविक हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रातःकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्म साजरा केला जातो; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे अनेक ठिकाणी धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणे शक्य नाही. अशा वेळी हनुमान जयंतीनिमित्त घरीच श्री मारुतीची उपासना करावी.

१. कलियुगात नामस्मरण ही सर्वोत्तम साधना सांगितली गेली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानतत्त्व इतर दिवसांपेक्षा १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते.त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी ‘श्री हनुमते नमः’ हा नामजप अधिकाधिक भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

२. ज्यांच्या घरी हनुमान जन्म साजरा केला जातो, त्यांनी प्रातःकाळी श्री मारुतीची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. पूजा करण्यासाठी श्री मारुतीची मूर्ती अथवा प्रतिमा (चित्र) उपलब्ध नसेल, तर श्री मारुतीचे मुखपृष्ठावर चित्र असलेला एखादा ग्रंथ किंवा ‘श्री हनुमते नम:’ ही नामपट्टी पूजेत ठेवू शकतो. तेही शक्य नसेल, तर पाटावर रांगोळीने ‘श्री हनुमते नमः’ हा नाममंत्र लिहून त्याची पूजा करावी. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, असा अध्यात्मातील सिद्धांत आहे. त्यानुसार मारुतीच्या मूर्तीमध्ये जे तत्त्व असते,तेच शब्दामध्ये म्हणजे श्री मारुतीच्या नामजपामध्येही असते.

३. पूजेसाठी आवश्यक साहित्य मिळण्यास अडचण असेल, तर उपलब्ध पूजासाहित्यामध्ये मारुतीरायाची भावपूर्ण पूजा करावी.जे पूजा साहित्य उपलब्ध नसेल,त्याऐवजी अक्षता समर्पित कराव्यात. घरी उपलब्ध असल्यास देवासमोर श्रीफळही वाढवू शकतो. सुंठवड्याचा नैवेद्य दाखवणे शक्य नसेल, तर अन्य गोडपदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

६. बलोपासना करून हनुमंताची कृपा संपादा

धर्म-अधर्म यांच्या लढ्यातील महत्त्वाचे दैवत म्हणजे हनुमंत.हनुमंताने त्रेतायुगात रावणाविरुद्ध युद्धात प्रभु श्रीरामास सहकार्य केले,तर द्वापार युगात महाभारताच्या घनघोर युद्धात तो कृष्णा र्जुनाच्या रथावर विराजमान होता. हिंदुस्थानात मोगली सत्ता अत्याचाराचे थैमान घालत होत्या, त्या वेळी महाराष्ट्रात बलोपासना रुजवण्यासाठी समर्थ रामदासस्वामींनी हनुमंताच्या मूर्तींची ११ ठिकाणी स्थापना केली आणि हिंदूंमध्ये ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले. कोरोनामुळे जी विदारक परिस्थिती आज ओढावली आहे, त्यातून बलोपासनेचे महत्त्व अधोरेखित होते. त्यामुळे हनुमान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर बलोपासनेसह भगवंताची भक्ती करण्याचा संकल्प करूया.

संदर्भ – सनातन संस्थेचा लघुग्रंथ ‘मारुति’
संपर्क क्र : 9975592859

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: