पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केले, राज्याच्या तिजोरीवर वर्षाला २५०० कोटी रुपये भार पडणार
केंद्र सरकारने काल मोठा निर्णय घेतला. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयाने पेट्रोलचा दर 9.50 पैसे आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाला. केंद्र सरकारने कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने देखील यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली होती. अखेर ठाकरे सरकारने देखील सर्वसामान्यांच्या मागणीला प्रतिसाद देत पेट्रोल डिझेलवरील VAT कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हॅट कमी करण्याचा निर्णय, तिजोरीवर वर्षाला २५०० कोटी रुपये भार पडणार
आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे वर्षाला सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
दोनच दिवसांत पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी तर डिझेल ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त
केंद्र आणि राज्याने कमी केलेल्या करामुळे दोनच दिवसांत पेट्रोल आता ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झालं आहे. तर डिझेल ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झालं आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयाने महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.