Cordelia Cruise Drug Party Case: आर्यन खानला क्लिनचिट मिळताच समीर वानखेडे म्हणाले ‘सॉरी’!
एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली २ ऑक्टोबर २०२१मध्ये कॉर्डिलीया क्रुझवर धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी काहीजणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यामध्ये आर्यन खानदेखील समावेश होता. आर्यन खानला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्यात आले असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोपही केले होते.
आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एका वृ्त्त वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली होती. समीर वानखेडे यांना आर्यन खानबाबत प्रश्न विचारताच, त्यांनी सुरुवातीला सॉरी, सॉरी असं म्हटलं आहे. मला या प्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाहीये. मी आता एनसीबीमध्ये नाहीये. तुम्ही एनसीबी अधिकाऱ्यांशी बोला, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानवर खोटो आरोप लावले असल्याचा दावाही त्यांनी केला होता. या गदारोळानंतर एनसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली होती. या समितीनेही आर्यन खानला क्लीनचीट दिली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती.