संभाजीराजेंची ठरवून कोंडी केली, उद्धवजींनी माझ्याप्रमाणे त्यांचाही फोन उचलला नाही : फडणवीस
अपक्ष म्हणून राज्यसभेच्या रिंगणात उतरलेल्या छत्रपती संभाजीराजेंना सर्वपक्षीयांनी डावलल्यानंतर आज अखेर त्यांनी माघार घेतल्याची घोषणा केली. राजेंनी लढण्याआधीच तलवार मान्य केल्याने त्यांच्या माघारीवर विविध नेते उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत. आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांना याचविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी राजेंच्या माघारीला सेनेला जबाबदार धरत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले, “खरं म्हणजे संभाजीराजेंची कोंडी करण्यात आली. पवारसाहेबांना नीट माहिती होतं, यावेळची जागा आपल्याकडे नाही. ही जागा शिवसेनेकडे आहे. पण तरीही त्यांनी आपला पाठिंबा असल्याचं आणि उरलेली मतं राजेंना देण्याची घोषणा केली. म्हणजेच पाठिंबा देण्याचं चित्र निर्माण केलं गेलं. त्यानंतर सेनेने आक्रमक भूमिका घेत दोन जागांवर लढण्याची घोषणा केली. नंतर संभाजीराजेंना काही अटी शर्थी टाकल्या. पण संभाजीराजेंनी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की कोणत्याही पक्षात न जाता मी अपक्ष लढणार. मात्र एकाच वेळी त्यांच्याशी चर्चा करुन बाहेर शिवबंधन बांधण्याच्या बातम्या सोडल्या आणि सवयीप्रमाणे त्यांनी राजेंचा फोन उचलला नाही. माझाही उचलला नव्हता. मला वाटतं नवीन काही घडलेलं नाही.दरवेळी हे असंच वागतात. त्यानंतर सेनेकडून व्हिक्टिम कार्ड प्ले केलं जातं”
“जेव्हा मला संभाजीराजे भेटायला आले होते तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं होतं की सगळे मला पाठिंबा देतील, तेव्हा मला तुम्हीही पाठिंबा द्या, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की सगळ्यांनी पाठिंबा दिला तर मी पक्षश्रेष्ठींशी नक्की बोलेन पण त्यानंतर काय घडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं”, असंही फडणवीस म्हणाले.