मुंबईत उभारणार नवीन चौक, नाव असेल ‘लोकशाही’
या चौकामुळे फोर्ट परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून हा भाग अधिक खुलून दिसणार आहे. त्यामुळे या जागेची निवड करण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. चौकात कलाकृती आणि पोडियम असे दोन भाग असून ते स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व या लोकशाहीच्या खांबांचे प्रतीक असतील. लोकशाहीचे प्रतीक असलेली कलाकृती चौकात उभारली जाणार असून अँथोनी होवे हा कलाकार ती साकारणार आहे. नागरिकांना चौकात येऊन मोकळेपणाने वावरता, बोलता, संवाद साधता यावा, यासाठी एक विशिष्ट रचना करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या नियोजन विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
आमदार निधीतून खर्च
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून चौक उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून पाच कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. पालिकेने या कामासाठी चार कोटी २५ लाख ६८ हजार खर्चाची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध केली आहे.