मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं म्हणणं बरोबर नाही : श्रीमंत शाहू छत्रपती


कोल्हापूर : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं म्हणणं योग्य नाही. आतापर्यंत सगळ्यांनीच छत्रपती घराण्याचा सन्मान केला आहे. सेनेने उमेदारी दिली नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान केला असं म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात झालेला ड्राफ्ट कच्चा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यूटर्न घेतला असं म्हणता येणार नाही”, असं वक्तव्य संभाजीराजेंचे वडील श्रीमंत शाहू महाराज यांनी केले.

संभाजीराजेंना उमेदवारी न देऊन शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, अशी टीका विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या टीकेला छत्रपती शाहूंनी उत्तर दिलं. तसेच संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगाने मागील १० दिवसांतील राजकीय घडामोडींवर शाहू महाराजांनी भाष्य केले. आज कोल्हापुरातील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही खरं तर फडणवीसांची खेळी होती, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं.

“शिवसेनेने मान राखला नाही असं बोलणं चुकीचं आहे. संभाजीराजेंना अपक्ष उभं राहायचं असेल तर इतरांना भेटणं गरजेचं होतं. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला असं बोलणंही बरोबर नाही. सेना आणि संभाजीराजेंमध्ये कच्चा ड्राफ्ट तयार झाला होता. पूर्ण ड्राफ्टिंग तयार झालं नव्हतं”, असं म्हणत शाहू महाराजांनी संभाजीराजेंचे कान टोचले.

“देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्वत:च्या बळावर पुढे जाणे किंवा इतर पक्षाचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय संभाजीराजेंकडे होते. मागील वेळी राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेतानाही आम्ही त्यांना ती घेऊ नये असं मत मांडले होते. परंतु त्यांनी वैयक्तिक तो निर्णय घेतला. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी राजकीय जी पाऊले उचलली आहेत. त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी चर्चा केली नाही. यात छत्रपती घराणं कुठे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असं म्हणता येणार नाही”, असं शाहू छत्रपती म्हणाले”

कोल्हापुरातून संजय पवार यांना उमेदवारी मिळाल्याचं समजताच मी त्यांना फोन केला. त्यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असंही आवर्जून शाहू महाराजांनी सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: