शाहूराजांचं सत्य म्हणजे अंबाबाईचा प्रसाद, त्यांनी फडणवीसांचा मुखवटा उघडा पाडला : राऊत


कोल्हापूर : “राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन शिवसेनेने संभाजीराजेंची कोंडी केली, असा अपप्रचार भाजपने केला. पण छत्रपती शाहूंनी आज फडणवीस आणि कंपनीचा मुखवटा फाडला. भाजपवाल्यांनो आतातरी शहाणे व्हा आणि कपटी कारस्थाने बंद करा”, अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला. तसेच शाहूराजांचं सत्य म्हणजे आम्हाला अंबाबाईने दिलेला प्रसाद आणि आशीर्वाद आहे असं आम्ही मानतो, असंही राऊत म्हणाले.

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडल्याचा आरोप केला. त्यावर आज संभाजीराजेंचे वडील शाहू महाराजांनी संभाजीराजेंचे कान टोचले. उद्धव ठाकरे आणि राजेंमध्ये कोणताही फायनल ड्राफ्ट तयार झाला नव्हता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यु टर्न घेतला असं म्हणणं बरोबर ठरणार नाही, असं शाहूराजे म्हणाले. शाहूराजांच्या याच वक्तव्याचा संदर्भ देत कोल्हापुरातील शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत राऊतांनी जोरदार बॅटिंग करत भाजपवर टीकेची झोड उठवली.

शाहूंच्या घराण्याने सत्याची कास सोडली नाही

राऊत म्हणाले, “शाहू महाराजांचे मी आभार व्यक्त करतो. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा संभ्रम त्यांनी आज दूर केला. शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न फडणवीस आणि कंपनीने सुरु केला होता. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा उघडा पाडला. कोल्हापूरच्या भूमीत अजूनही सत्य आहे. प्रामाणिकपणा आहे आणि शाहूंच्या घराण्याने सत्याची कास सोडली नाही, हे त्यांनी समस्त महाराष्ट्राला दाखवून दिलं”.

भाजपवाल्यांनो आतातरी शहाणे व्हा आणि कपटी कारस्थाने बंद करा

“आज छत्रपतींनी सांगितलं, सहाव्या जागेवरुन संभाजीराजेंच्या संदर्भाने जो वाद सुरु आहे तो निरर्थक आहे. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अजिबात अपमान केलेला नाही. शिवसेनेने कायमच छत्रपती घराण्याचा सन्मान केला आहे. छत्रपतींनी आजही मनाने शिवसैनिक असल्याचं गर्वाने सांगितलं. शाहूराजांचं सत्य म्हणजे आम्हाला अंबाबाईने दिलेला प्रसाद आहे, आशीर्वाद आहे, असं आम्ही मानतो. भाजपवाल्यांनो आतातरी शहाणे व्हा आणि कपटी कारस्थाने बंद करा. शिवसेनेने छत्रपतींची कोंडी केली, असं फडणवीस सांगत होते. पण आता त्यांचीच कोंडी झाली”, असा टोलाही त्यांनी लगावला.

शाहू महाराजांनी फडणवीसांचा मुखवटा उघडा पाडला

“शिवसेनेची जागा होती. आम्ही त्यांना ऑफर दिली. सन्मानाने या आणि खासदारकी घ्या, असं आम्ही त्यांना सांगितलं. पण भाजपने कारस्थान केलं. सेनेला बदनाम करण्यासाठी भाजपने त्यांचा वापर केला. पण आज प्रत्यक्ष शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला”, असं राऊत म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: