खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य
श्रीरामपूर, दि.३०/०८/२०२१,महासंवाद : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे, आज श्रीरामपूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तशी घोषणा केली.
सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल
राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा आधुनिक सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे. खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहित व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. खाते उताराची ही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे. महसूल विभागातील कोतवाल, तलाठी त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंती अर्थात दोन ऑक्टोबरपासून सुरू करणार आहेत. आज श्रीरामपूर येथे शासकीय कार्यक्रमानिमित्ताने आले असताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपक्रमाची घोषणा केली. खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.
जनतेला अधिक जलद , बिनचूक सेवा देताना त्यांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्या – महसूल मंत्री
याबद्दल बोलताना महसूल मंत्री म्हणाले, नागरिकांना सहज व जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही खाते उतारा सोपा सुटसुटीत आणि बिनचूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा खाते उतारा थेट शेतकऱ्यांच्या आणि खातेदाराच्या हातात देऊन आम्ही हा नव्या स्वरूपातील सातबारा उतारा अधिक लोकाभिमुख करणार आहोत. याशिवाय पुढील काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घेण्याचेही महसूल यंत्रणेस स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.