दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार – पालकमंत्री सतेज पाटील

दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार – पालकमंत्री सतेज पाटील Strict action will be taken against the culprits after investigating the accident – Guardian Minister Satej Patil

भुदरगड ,04/09/2021 – भुदरगड तालुका मेघोली येथील लघु पाटबंधारे तलाव फुटल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (1सप्टेंबर) रात्री उशिरा घडली. तलावाचा भराव वाहून गेलेल्या प्रत्यक्ष ठिकाणाला आज कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देऊन संबंधित अधिकारी व गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या भावना समजावून घेतल्या.

हा प्रकल्प फुटल्याने अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते यांचा व काही जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

  या दुर्घटनेमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना व नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येणार असून, दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

या भागातील शेतकरी व गावकऱ्यांची पाण्याची सोय होण्यासाठी या प्रकल्पाचे बांधकाम तात्काळ करण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच येत्या आठ दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून, पंचनाम्यांबाबत कोणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी  प्रशासनाला दिल्या आहेत.

     या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . नवले, ममदापूर, वेंगुरुळ, सोनूर्ली, तळकरवाडी आदी गावातील शेतीमध्ये पाणी शिरले तसेच ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. प्रशासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली आहे . 

यावेळी खासदार संजय मंडलिक,आमदार प्रकाश आबीटकर, प्र.उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी अडसूळ,पदाधिकारी, सरपंच, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: