स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून ‘अन्नप्रक्रिया सप्ताहा’चे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून ‘अन्नप्रक्रिया सप्ताहा'चे आयोजन

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2021,PIB Mumbai - देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त, देशभर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘अन्नप्रक्रिया सप्ताहाचे’ आयोजन केले आहे. सहा ते 12 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या या विशेष सप्ताहादरम्यान मंत्रालयाने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

आज म्हणजेच सहा सप्टेंबर रोजी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका अधिकृत व्हिडिओद्वारे अन्नप्रकिया सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. पीएमएफएमई योजनेच्या लाभार्थी राधिका कामत यांच्या यशोगाथेचा व्हिडिओ मंत्रालयाच्या ‘आत्मनिर्भर उद्योग’ मालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

या सप्ताहाचा भाग म्हणून, मध्यप्रदेशात दमोह इथे, भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेद्वारे टॉमटो प्रक्रिया आणि मूल्यवर्धन विषयक वेबिनार देखील आयोजित करण्यात आले होते. तसेच, 811 स्वयंसहायता गटांसाठी, 3.16 कोटी रुपयांचे बीजभांडवल ग्रामपंचायत पातळीवरील महासंघाच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

याच अनुषंगाने, केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते मध्यप्रदेशातच मांडला जिल्ह्यात, सीईएफपीपीसी योजनेअंतर्गत, मेसर्स विभूति मार्ट प्रायव्हेट लिमिटेड इथे फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले- प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत, हे फूड पार्क सुरु करण्यात आले आहे.

यावेळी बोलतांना, अन्नप्रक्रिया क्षेत्रात अत्याधुनिक प्रक्रिया सुविधा विकसित केल्याबद्दल, प्रल्हाद सिंह पटेल, यांनी अन्नप्रक्रिया उद्योगातील प्रवर्तकांचे कौतूक केले. यातून, शेतकरी, बचत गट आणि सूक्ष्म उद्योगांना लाभ होईल तसेच रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाची एकूण किंमत 12.90 कोटी रुपये असून त्यासाठी 4.65 कोटी रुपयांचे अनुदान, केंद्र सरकारकडून मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: