छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाव्दारे अखंडपणे रुग्णसेवा Uninterrupted patient care through Chhatrapati Pramila Raje General Hospital
कोल्हापूर /जिल्हा माहिती कार्यालय : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामधील बाह्यरुग्ण विभाग हा सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यरत असतो. बाह्यरुग्ण विभागामध्ये येणाऱ्या सर्व संशयित तसेच आपत्कालीन रुग्णांची तपासणी होवून त्यांचा आवश्यक त्या चाचण्या केल्या जातात व त्यांना औषधोपचार केला जातो.तसेच गंभीर परिस्थितीत असलेल्या अत्यवस्थ रुग्णांना तात्काळ अपघात विभागाकडे दाखल करून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकरवी योग्य ते उपचार केले जातात.
बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांच्या रोग निदानाकरिता आवश्यक चाचण्या या सकाळी 8 ते दु. 2 या वेळेत ओपीडीमध्ये संबधित विभागात बाह्यरूग्ण म्हणून केल्या जातात. त्यानंतर उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांच्या व आंतररुग्ण म्हणून दाखल असणाऱ्या रुग्णांच्या रोग निदान आवश्यक चाचण्या 24 तास सुरु असून दैनंदिन रुग्णसेवा अखंडपणे चालू ठेवण्यासाठी कोणत्याही सार्वजनिक अथवा साप्ताहिक सुट्टया न घेता अविरतपणे चालु असते.
डेंग्यु,चिकनगुनिया व इतर साथीच्या आजारां करिता संशयित रूग्णांचे नमुने तपासणीकामी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाह्यरूग्ण विभाग रूम. नं. 217 येथे स्वीकारले जातात व तदनंतर येणाऱ्या रूग्णांचे तपासणीसाठी नमुने दुपारी 2 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अपघात विभाग येथे घेतले जातात. तर संकलीत झालेले नमुने किमान 20 ते 25 इतक्या स्लॉटनुसार वर्गीकरण करूनच तपासणी केली जाते. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तपासणीचे कामकाज केले जाते. तरीदेखील प्राथमिक स्तरावर रुग्णाच्या तपासणीचा अहवाल त्वरित दिला जातो. तर स्विकारलेल्या नमुन्यामध्ये काही प्रमाणात साशंकता वाटत असल्यास त्याची तपासणी अत्याधुनिक यंत्राव्दारे केली जाते.
डेंग्यू,चिकनगुनिया व इतर साथीच्या आजाराचे तपासणी अहवाल त्वरित देण्याकरिता येत्या दोन-तीन दिवसामध्ये स्थानिक पातळीवर रॅपीड टेस्ट कीटस खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि ते उपलब्ध झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे 24 तास या सुविधा या रुग्णालयामध्ये कार्यान्वित राहतील अशी माहिती राजर्षी छत्रपती शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली आहे.
Like this:
Like Loading...