शिवरस्ते, पाणंद रस्त्यांसाठी लोकसहभाग महत्वाचा – तहसीलदार सुशिल बेल्हेकर

शिवरस्ते, पाणंद रस्त्यांसाठी लोकसहभाग महत्वाचा – तहसीलदार सुशिल बेल्हेकर Public participation important for Shivaraste, Panand roads – Tehsildar Sushil Belhekar


पंढरपूर, दि.09/09/2021/नागेश आदापूरे – रस्ते हे देशाच्या विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतापर्यंत रस्ता असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वीज, पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेतामध्ये पोहोचण्यासाठी रस्ते महत्त्वाचे आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करुन विविध योजनांच्या माध्यमातून शिव रस्ते, पाणंद रस्ते या योजनेत लोकसहभागही महत्वाचा असल्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितले.

  बोहाळी ता.पंढरपूर येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून 2 कि.मी चा मुरुमीकरणाचा रस्ता तयार केल्याने तहसिल कार्यालय पंढरपूर येथे प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री व बोहाळी गावचे संबंधित शेतकरी उपस्थित होते.

    शेती कामासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये नांगरणी, पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. मात्र काही ठिकाणी शेतरस्त्याच्या अभावामुळे शेतापर्यंत यंत्रसामग्री पोचविण्यात अडचणी येतात. तसेच शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यातही अडथळा निर्माण होतो.

    पावसाळ्यात शेतात पाणी साठल्यामुळे व चिखलामुळे वाहतुक करणे त्रासदायक होते. ग्रामीण भागात रस्त्याच्या कारणावरून अडचणी निर्माण होतात तसेच रस्त्यांची कामे प्रलंबित पडतात. शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहचवण्यात अडचणी येतात यामध्ये शेतकऱ्यांचेच नुकसान होते. हे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेतील शिव रस्ते,पाणंद रस्त्यां साठी लोकसहभागाने जास्तीतजास्त शेत रस्ते वापरात आणावेत असे, आवाहन तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.

लोकसहभागातून बोहाळीतील शेतकऱ्यांनी केलेला रस्ता आदर्शवत

 मौजे बोहाळी (ता.पंढरपूर) येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येत स्वखर्चातून 2 किमीचा रस्ता मुरुमीकरण केला आहे.या रस्त्यामुळे ऐन पावसाळ्यातही शेत मालाची वाहतूक करणे शेतकऱ्यांना सोपे जाणार आहे. रवींद्र कुलकर्णी, दिलीप गायकवाड,साहेबराव जाधव,उमेश नलावडे या शेतकऱ्यांनी एकत्रित येत अनिल बाबर,पिंटू खुळे, अमोल गायकवाड आदी शेतकऱ्यांनी लोकसहभागातून रस्ता तयार केला आहे. या शेतकऱ्यांनी तयार केलेला रस्ता हा इतर शेतकऱ्यांना आदर्शवत उदाहरण असल्याचे श्री. बेल्हेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: