उगवतीचे रंग – एका अथक जिद्दीचा प्रवास : राहुल देशमुख
उगवतीचे रंग – एका अथक जिद्दीचा प्रवास : राहुल देशमुख
(भाग दोन)
आपल्या संस्थेत अंधांना प्रशिक्षण देणारं पहिलं संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु व्हावं आणि त्याच्या साहाय्याने त्यांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदत व्हावी हे त्याचं ध्येय होतं. पण हे सगळं करताना प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागलं. जागा मिळवणं , संगणक मिळवणं , आर्थिक मदत मिळवणं या सगळ्या गोष्टी प्रचंड जिकिरीच्या होत्या. पण मनामध्ये काही करण्याची तीव्र इच्छा असली की मदत मिळत जाते. तशीच काही परोपकारी स्वभावाची माणसे राहुलच्या मदतीला धावून आली. त्यांच्या सहकार्याने हळूहळू संस्था सुरु झाली. त्यांच्या कामाविषयी सुधा मूर्तीना कळलं आणि त्यांनी स्वतः होऊन राहुलशी संपर्क साधला. अंधांना संगणकासाठी आवश्यक असणारं बोलकं सॉफ्टवेअर त्याला हवं होतं . त्याची किंमत खूप होती.सुधा मूर्तीनी हे सॉफ्टवेअर राहुलच्या संस्थेला दिलं आणि इथून पुढे त्यांच्यात आणि सुधा मूर्तींच्या इन्फोसिसमध्ये एक आगळंवेगळं नातं निर्माण झालं. MKCL ने त्यांच्या संस्थेला MSCIT हा कोर्स सुरु करण्यासाठी परवानगी दिली. मात्र ही परवानगी देताना अनेक अटी घातल्या. त्यासाठी उत्तम प्रतीचे संगणक मिळणे आवश्यक होते किंवा त्यांच्याकडचे संगणक अपग्रेड करणे आवश्यक होते. ते सगळे मोठ्या प्रयत्नातून केले. अनेक विद्यार्थी संगणक साक्षर होऊन निरनिराळ्या ठिकाणी नोकरीत रुजू झाले. त्याच्या संस्थेचं संगणक प्रशिक्षणाचं कार्य पाहून MKCL चे प्रमुख विवेक सावंत यांनी स्वतः होऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि MKCL तर्फे मानाचा पुरस्कार राहुलच्या संस्थेला मिळाला. हा पुरस्कार त्याला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या हस्ते मिळाला. हा राहुलचा आणि संस्थेचा खूप मोठा गौरव होता. या निमित्ताने विवेक सावंत हेही संस्थेशी आपुलकीच्या नात्याने जोडले गेले.
राहुल देशमुखांच्या या सगळ्या प्रवासात त्यांना मोलाची साथ मिळाली ती त्यांच्या डोळस सहचारिणी देवता अंदुरे – देशमुख यांची. राहुलची आणि त्यांची ओळख कॉलेजमध्ये शिकत असतानाची. राहुल आणि देवता यांनी जीवनामध्ये एकमेकांना साथ द्यायची ठरवून विवाहाचा निर्णय घेतला. हा निर्णय दोघांनीही विचारपूर्वक घेतला होता. तरीही हा निर्णय अमलात आणणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण अशा वेळी राहुल यांचे मामा श्यामराव दंडवते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने लग्नात कोणतीही अडचण आली नाही आणि दोघे विवाहबंधनात अडकले.राहुल प्रमाणेच देवता या सुद्धा ध्येयवादी वृत्तीच्या. नेहमीचे सरधोपट आयुष्य न जगता काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी त्यांच्यामध्ये आहे. म्हणूनच त्यांनी ध्येयवादी असलेल्या राहुलला आपला जीवनसाथी म्हणून निवडले. त्यांच्या रूपाने खरोखर एक देवताच राहुलच्या आयुष्यात आली असे म्हटले तर वावगे होणार नाही. राहुलच्या स्वप्नांना आता देवताचे पंख लाभले. देवता यांच्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव आहे. देवता या एमबीए असून टाटा ग्रुपमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होत्या. पण त्यांनी आता चांगल्या पगाराची कार्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून संस्थेच्या कामासाठी पूर्णवेळ वाहून घेतलं आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांना राहुल सरांबरोबर देवता मॅडम सुद्धा तेवढ्याच प्रिय आहेत. राहुल हे सध्या बँक ऑफ इंडियामध्ये स्केल वन ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत देवता संस्थेची सगळी जबाबदारी बघतात.
अंधांसाठी काम करता करता राहुल यांनी इतरही दिव्यांगांसाठी काम करायला सुरुवात केली. त्याची सुरुवात एका कर्णबधिर मुलीपासून झाली. या मुलीला बोलता येत नव्हते, ऐकू येत नव्हते. पण शिकण्याची तीव्र इच्छा होती. तिचे वडील एक साधे वॉचमन होते. जवळ पैसा नव्हता. इतर संस्थांनी त्यांच्याकडून पैसे घेऊन नंतर या मुलीला शिकवण्यासाठी नकार दिला होता. पण त्या मुलीची शिकण्याची इच्छा आणि तिच्या वडिलांचे आर्जव पाहून राहुल यांनी त्या मुलीला शिकवण्याचे ठरवले. अशा मुलांना शिकवणे ही एक वेगळी आव्हानात्मक जबाबदारी असते. पण ती यशस्वीरीत्या राहुल यांनी पेलली. तिच्याप्रमाणेच मग हळूहळू अनेक विद्यार्थी संस्थेत आले. त्यातील बरेचसे विद्यार्थी आज स्वावलंबी होऊन वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करीत आहेत.
राहुल यांनी अंध,अपंग विद्यार्थ्यांसाठी जे होस्टेल सुरु केले ते अनेक दृष्टीने आगळेवेगळे आहे. कुमठेकर रस्त्यावर असलेले हे वसतिगृह म्हणजे पुण्यातील पहिले विशेष बॅरिअर फ्री म्हणजेच अडथळा विरहित, सर्व सोयींनी समृद्ध असे आहे. त्यात ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या गरजू अंध-अपंग विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवण्याची उत्तम सोय या चैतन्यविश्वात आहे. या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता, ते स्वावलंबी व्हावेत, जीवन जगण्यास सक्षम व्हावेत या उद्देशाने राहुल यांनी आपल्या संस्थेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकल्प राबवायला सुरुवात केली. त्यामध्ये काही प्रमुख असे आहेत. त्यांनी अंधांसाठी डिजिटल लायब्ररीची स्थापना केली. त्यात संगणकाच्या साहाय्याने अंध विद्यार्थी क्रमिक आणि अवांतर वाचनाची पुस्तके ऐकू शकतात. त्यामुळे आता त्यांना आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी ब्रेल लिपीची किंवा वाचकाची मदत घेण्याची गरज उरली नाही. त्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून रिक्रिएशन सेंटर सुरु केले. यातून मुलांचा शैक्षणिक विकासाबरोबरच मानसिक, सांस्कृतिक एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. शास्त्रीय गायन, वादन देखील शिकवले जातात. एक योग शिक्षक येऊन मुलांना योग आणि प्राणायामाचे शिक्षण दिले जाते.
गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, शैक्षणिक दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी हे सण आणि सर्व दिनविशेष आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. या सगळ्या गोष्टींमुळे मुलांना ही केवळ शिक्षण देणारी संस्था असं न वाटता एक मोठं कुटुंब आहे आणि आपण त्या कुटुंबाचा एक भाग आहोत असं वाटत राहतं. बऱ्याचदा येथून घरी जाण्यासाठी मुलांचा पाय निघत नाही, एवढे प्रेम त्यांना इथे मिळते.
आपले विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत मागे पडू नयेत यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्पोकन इंग्लिशचे वर्ग, गणिती कौशल्यासंबंधीचे वर्ग या ठिकाणी घेतले जातात. वेगवेगळी सॉफ्ट स्किल्स मुलांना शिकवणं हेही यासोबत सुरु असतं . विविध क्षेत्रातील सेवाभावी आणि मान्यवर तज्ज्ञ मंडळी मुलांसाठी मोफत मार्गदर्शन करतात. या संस्थेचे कार्य पाहून पूर्वी राज्यपाल असलेले आणि साताऱ्याचे खासदार असलेले श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू आणि त्यांच्या पत्नी दीपा लागू, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सर्वांचे प्रेम आणि मार्गदर्शन मिळते. त्यासोबतच पुण्यातील अनेक मान्यवर लोकही संस्थेशी जोडले गेले आहेत. डॉ लागू आज नसले तरी दीपा लागू विशेष मायेने संस्थेकडे लक्ष देतात. आजपर्यंत या संस्थेतून साधारण १६५० विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. ही सगळी मुलं अगदी सामान्य गरीब घरातली आहेत. शेतकरी, मजूर, हमाल, वॉचमन अशा पालकांची आहेत. यातली काही मुलं आज या संस्थेत शिकून शिक्षक झाली आहेत, कोणी क्लार्क झाली आहेत, कोणी एमपीएससी किंवा युपीएससी या अत्यंत कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासनात अधिकारपदावर आहेत. या गरीब घरातल्या मुलांना प्रगतीची ही संधी आणि यशाची दारे केवळ राहुलजींमुळे उघडली.
अंध-अपंगांना त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरु ठेवता यावे यासाठी एका विशेष शिष्यवृत्ती प्रकल्पाची स्थापना राहुल यांनी केली. त्या अंतर्गत दरवर्षी १५० गुणवान मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेचे हे सर्व उपक्रम आणि प्रकल्प अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी मोफत आहेत. विशेष म्हणजे संस्था शासनाचे कोणतेही अनुदान घेत नाही. संस्थेचे कार्य बघून प्रभावित झालेल्या दानशूर लोकांच्या मदतीतून हे कार्य सुरु आहे. राहुल यांना स्वतः अंध असताना इतरांसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून आजवर जवळपास ३५ मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात सुप्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांच्या हस्ते IBN सेव्हन बजाज आलियान्झ सुपर आयडॉल पुरस्कार, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ' मानवता पुरस्कार ' माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी व उद्योजक नवीन जिंदाल यांच्या हस्ते दिल्लीमध्ये ' राष्ट्रीय स्वयम सन्मान पुरस्कार, ' सुप्रसिद्ध अभिनेता अभय देओल यांच्या हस्ते ' पॉजिटीव्ह हेल्थ हिरो पुरस्कार ' माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते सामाजिक गौरव पुरस्कार, ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या हस्ते महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेड ( MKCL ) पुरस्कार, पुणे हिरो अवॉर्ड , केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड यांच्यातर्फे ' लिज्जत रत्न पुरस्कार ' असे अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत. हे सर्व पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे आहेत. या सर्व संस्थांनी आणि व्यक्तींनी स्वतः होऊन राहुल यांच्या कार्याची दखल घेत हे पुरस्कार प्रदान केले आहेत. यातील एखादा पुरस्कार मिळवायला सुद्धा एखाद्याचे संपूर्ण आयुष्य खर्ची होऊ शकते. सर्व पुरस्कारांचा उल्लेख या ठिकाणी लेख अधिक मोठा होऊ नये म्हणून फक्त टाळला आहे.
राहुल यांच्या मनात संस्थेसाठी आणखी अनेक प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. अधिकाधिक अंध-अपंगांना सक्षम करून आपल्या पायावर उभं करण्याचा त्यांचा मानस आहे. ज्या समस्यांना अंध असल्याने आपल्याला तोंड द्यावं लागलं, त्या समस्या अंध अपंग विद्यार्थ्यांना येऊ नयेत हीच या दोघा पती पत्नीची इच्छा आहे. त्यांना त्यांच्या कार्यासाठी मिळणाऱ्या पुरस्कारांसोबतच आणखी मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. राहुल यांचं कार्य डोळस व्यक्तींना सुद्धा प्रेरणा देणारं आहे. असं कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याला हातभार लावणं ही आपली सामाजिक आणि नैतिक सुद्धा जबाबदारी आहे. राहुल आणि देवता या दोघांना त्यांच्या कार्यासाठी सलाम आणि खूप खूप शुभेच्छा...!
आपल्याला राहुल यांच्याशी संपर्क करावयाचा असल्यास, किंवा मदत करण्याची इच्छा असल्यास पुढे त्यांची माहिती देत आहे.
श्री राहुल वसंतराव देशमुख
संपर्क ९८२२५९५७५७, ०२०/ २४४७९९००
ईमेल: [email protected]
संस्थेची वेबसाईट: www.nawpc.org
बँक डिटेल्स
अकाउंट – NAWPC
बँक – Bank of India, Laxmi Road Branch, Pune
Acc No. – ०५०५१०११०००६११७,
IFSC – BKID ००००५०५
विश्वास देशपांडे, चाळीसगाव