गोष्ट एका चिऊताई ची
गोष्ट एका चिऊताई ची कालपासून काहीच करमत नव्हते. हॉलमध्ये वेताची फुलदाणी रिकामीच दिसत होती.गेले काही महिन्यांपासून तिथे चिऊताईने आपली वस्ती केली होती .कालपर्यंत मम्मी चिऊ, पप्पां चिऊ व त्यांचे पिल्लू चिऊ यांचा गोंधळ ऐकू यायचा तो कोठेही दिसत नाही म्हणून मन अस्वस्थ झाले होते.पटकन हॉलचे दार उघडून गच्चीत आले आणि माझी नजर त्यांचा शोध घेऊ लागली. तेवढ्यात चिऊ चिऊ ऐकू आले .पाहिले तर मम्मी आणि पप्पा चिऊ यांच्यामध्ये पिल्लू चिऊ बसले होते. जशी एक माहेरवासिण आपले बाळंतपण सुखरूप करून बाळासहित आपल्या घरी परतत होती आणि जाताना भावपूर्ण नजरेने बघत आभार प्रदर्शित करत होती.

माझ्या डोळ्यात पाणी आले.तसे पाहिले तर या दोन महिन्यांपासून तिचे नि माझे नाते निर्माण झाले होते. तिला मातृत्वाची चाहूल लागली की तिने सुरक्षित जागा शोधायला चालू केली.आमचा छोटा हॉल ,मोठा हॉल,व्हरांडा, गच्ची सर्वकाही धुंडाळून काढले.बरेच दिवसांच्या शोधानंतर सरतेशेवटी तिला मोठ्या हॉलमधील वेताची फुलदाणी पसंत पडली .आधांतरी उंचावर प्रशस्त त्यात थर्माकोल ची गादी मग नंतर जोडीने एक एक गवताची काडी आणून घर मांडणी चालू केले.काही दिवस मध्ये गेले .पुन्हा दोघांची ये-जा चालू झाली.आता छोट्या चिऊचा आवाज येऊ लागला.तोंडात दाणा आणून ते आपल्या बाळाला भरवू लागले. काही दिवसांनी ते बाळ फुलदाणीच्या काठावर दिसू लागले. तेथून डोकवायचे व परत घरट्यात जायचे. आता छोट्या चिऊला पंख फुटले होते. मम्मी पप्पा फुलदाणी तून कपड्यांसाठी बांधलेल्या दोरीवर उडून दाखवत मग ते पण दोरीवर यायचे आणि पुन्हा घरट्यात परत जायचे . परवा दिवशी तर ते कपड्यांच्या दोरीवर येऊन बसले परंतु दोरीवरून घराकडे परतताना एकदम फरशीवर आले. तेथून वर घरट्यात जायचे एवढी मोठी भरारी मारायचे बळ त्याच्या पंखात नव्हते. ते थोडेसे उडायचे पुन्हा खाली बसायचे.
मम्मी पप्पा चिऊ त्याच्या अवतीभवती फिरू लागले. त्याला त्यांच्या भाषेत बोलु लागले. मम्मीने तेथुन खालच्या खिडकीत परत खिडकीवरून दोरीवर, दोरीवरून घरट्याकडे कसे जायचे याचे मार्गदर्शन केले. तरीही त्या बाळाच्या पंखात तेवढी ताकत नव्हती. त्या पिलाची मम्मी पुन्हा पुन्हा कसे उडायचे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवायची. आम्ही मोठ्या हॉलमध्ये गेलो की त्याच्या भोवती संरक्षण देण्यासाठी घिरट्या घालायची ,शेवटी मातृहृदयी ते. पिल्लू मात्र छोटे छोटे उंचीपर्यंत उडून दमून गेले होते. शेवटी दुपारी पिल्लू बाळाने शक्ती पणाला लावली आणि घरट्याकडे पोहोचले. त्याला त्याच्या मम्मी पप्पांनी एकदाचे घरट्यात ढकलले आणि स्वत: मम्मी-पप्पा दोघेही काठावर रात्रभर बसून राहिले कारण आघाव बाळ पुन्हा बाहेर पडून धोका होऊ नये याची खबरदारी घेत होते.
सकाळी उठून बघते तर चिवचिवाट नाही, छोट्या बाळाची चिवचिव नाही .घरटे रिकामेच होते. पळतच गच्चीत गेले तर ते गच्चीच्या झाडावर बसलेले जणूकाही आमचीच वाट बघत होते. तिघांनीही आमच्याकडे पहिले कृतज्ञता म्हणून आणि चिव चिव करून आपल्या बाळाला घेऊन नवीन विश्वात उडून गेले ,आता त्यांचे बाळ मोठे झाले होते ना !
- डॉ सपना राजेश फडे , पंढरपूर