जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती There will be no shortage of oxygen in the district – Guardian Minister Dattatraya Bharane

पंढरपूर दि.17 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. कोणत्याही रुग्णास उपचार करताना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये. यासाठी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय तसेच मेडीकल कॉलेज येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री श्री भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, आमदार बबनराव शिंदे, नगराध्यक्ष साधना भोसले, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासनाकडून विशाखापट्टनम,कर्नाटक व पुणे येथून जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला. भविष्यात जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावू नये तसेच रुग्णांना वेळेत उपचार व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे रुग्णालयातील यंत्रणेवरचा ताण कमी होऊन रुग्णांना वेळेत योग्य उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही श्री.भरणे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील मेडीकल कॉलेज , उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर, माळशिरस येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (PSA) तसेच शासकीय रुग्णालयात आठ ठिकाणी द्रव्यरुप ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. शासकीय रुग्णालयात कायमस्वरुपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे.यामुळे ऑक्सिजन टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: