शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन National People’s Court

शेळवे /संभाजी वाघुले : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवार दि.25 सप्टेंबर 2021 रोजी सोलापूर शहर व तालुक्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश शशिकांत मोकाशी यांनी दिली आहे.

     लोकअदालतीमध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कलम 138  एन. आय. ॲक्ट, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे, भूसंपादन बाबतची प्रकरणे, तसेच बँक, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीचे दरखास्त, बँक लवाद दरखास्त प्रलंबीत व दाखलपूर्व, वाहतूक कायदेअंतर्गत ट्राफिक ई-चलनाची दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडी करुन मिटविणेसाठी ठेवण्यात आलेली आहेत.

दाखलपूर्व प्रकरणे म्हणजे महानगरपालिकाचे कर आकारणीची प्रकरणे, तालुका दक्षिण सोलापूर व तालुका उत्तर सोलापूर यांची ग्रामपंचायतीची कर आकारणीची प्रकरणे इत्यादी प्रकरणांसाठीचे लोकअदालत हे सोलापूर महानगरपालिका मराठी कॅम्प हायस्कूल, दक्षिण सदर बझार, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी न्यायिक अधिकारी, पॅनल विधिज्ञ आणि संबंधित खात्याचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

वाहतुक कायदेअंतर्गत ट्राफिक ई-चलनाची प्रकरणांमध्ये एस.एम.एस.द्वारा नोटीसा पाठविण्यात आल्या असून त्यामधील संबंधित पक्षकार हे संबंधित पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून किंवा ऑनलाईन पध्दतीने तडजोड रक्कम भरु शकतात. बँक, पतसंस्था इत्यादींची दाखलपूर्व प्रकरणांचे कामकाज जिल्हा न्यायालय, सोलापूर परिसरात होणार आहे. तालुक्याचे तालुक्याच्या ठिकाणी तर सोलापूर शहरातील न्यायालयातील प्रकरणे जिल्हा न्यायालय, आवार सोलापूर येथे लोकन्यायालयात घेतली जाणार आहेत.

शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीच्या दिवशी फौजदारी मामुली प्रकरणे निकाली काढण्यासाठी कार्यालयीन कामकाजाचा दिवस घोषित केला असल्याने त्यादिवशी सोलापूर जिल्हा न्यायालय परिसरामध्ये दोन न्यायालयांचे कामकाज चालू राहणार आहे. लोकअदालतीमध्ये जिल्ह्यामधील सर्व न्यायालयातील प्रलंबित 17688 व दाखलपूर्व 24144 प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. तसेच ई-चलनाच्या 28616 प्रकरणांत एस.एम.एस. द्वारे नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत.

लोकन्यायालयात सहभागी होताना कोरोना महामारी अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविणेसाठी हजर राहून लोकअदालतीचा फायदा घेण्याचे आवाहन न्यायाधीश श्री.मोकाशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: