चळे ग्रामपंचायतीमध्ये ४० लाखांचा गैरव्यवहार – ग्रामपंचायत सदस्य कोळी

  • चौकशी करून कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा
  • चळे ग्रामपंचायतीमध्ये ४० लाखांचा गैरव्यवहार ,ग्रामपंचायत सदस्य कोळी यांचा आरोप

पंढरपूर- तालुक्यातील चळे ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाच्या कार्यकाळात ४० लाख रूपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य चरणदास कोळी यांनी केला असून याबाबत चौकशी करून कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

याविषयी माहिती देण्यासाठी चरणदास कोळी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या काळात चळे ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. या चार महिन्यात चळे गावात चौदाव्या वित्त आयोगातून लाखो रूपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली. मात्र यापैकी अनेक कामे न करताच बिल काढण्यात आल्याचा आरोप कोळी यांनी केला आहे. भुयारी गटार, पाणी पुरवठा, रस्ता आदी कामे केवळ कागदावर पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम करण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र याचे बिल काढण्यात आले आहे. या विषयी कोळी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेत बुधवार ३ रोजी विस्तारअधिकार्‍यांकडून या सर्व कामांची व काढलेल्या बिलाची चौकशी करण्यात आली आहे.

परंतु सदर चौकशी वर कोळी यांनी आक्षेप घेतला असून अधिकारी संबंधित प्रशासकाचा बचाव करीत असल्याचा आरोप केला आहे.यापूर्वी देखील चळे येथील ग्रामसेवकाने १७ लाख रूपयाचा गैरव्यवहार केल्यामुळे त्यास निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. वारंवार होणार्‍या गैरव्यवहारांमुळे गावात विकासकामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असून गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा चरणदास कोळी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: