दे ठोसा… १-२ नाही तर भारताचे बॉक्सिंगपटू मारणार पदकांचा षटकार, पाहा कोणाला मेडल्स मिळणार
भारताच्या बॉक्सर्ससाठी आजचा दिवस चांगलाच यशस्वी ठरला. कारण आज फक्त अमितनेच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला नाही, तर भारताच्या सागर आणि जयस्मिन यांनीही दमदार विजय मिळवत आपेल उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. सागरने सेशेल्सच्या केडी इव्हान्स अॅग्नेसवर एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना भारतासाठी चांगलाच रंजकदार ठरला. सागर अहलावतने बॉक्सिंगमध्ये भारताची पदकांची घौडदौड कायम ठेवली, गुरुवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ९२पेक्षा जास्त किलो वजनी गटात सेशेल्सच्या केडी इव्हान्स अॅग्नेसवर वर्चस्व राखून उपांत्य फेरीत मजल मारली. हरियाणाच्या २२ वर्षीय खेळाडूने सुपर हेवीवेट उपांत्यपूर्व फेरीत इव्हान्सवर ५-० असा विजय मिळवून बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढवली.
अमित आणि सागर यांच्याबरोबर जयस्मिननेही आज विजय साकारला. महिलांच्या ५७-६० किलो वजनी गटामध्ये जयस्मिनने ट्रॉय गॉटर्नवर ४-१ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीसह भारताचे पदक निश्चित केले. या तिघांबरोबरच निखत झरीन (५० किलो), नितू गंगास (४८ किलो) आणि मोहम्मद हुसमुद्दीन (५७ किलो) यांनीही आपापल्या गटात पदकांची निश्चिती करण्यासाठी उपांत्य फेरी गाठली आहे.