शरद पवारांनी बोलणं टाळलं, पण संजय राऊतांसाठी राहुल आणि प्रियांका गांधी दोघेही मैदानात


नवी दिल्ली: पत्राचाळ प्रकरणात सध्या ईडी कोठडीत असणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेवर आणि कारवाईवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मौन साधलं आहे. संजय राऊतांना अटक होऊन चार दिवस झाले तरीही शरद पवारांनी ना प्रसार माध्यमांपुढे ना सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या (Sharad Pawar) जवळचे मानल्या जाणाऱ्या राऊतांवर ईडीने इतकी मोठी कारवाई केल्यावरही ते गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, शरद पवारांनी जरी मौन साधलेलं असलं तरी दिल्लीतून मात्र संजय राऊतांना समर्थन मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा या देखील राऊतांसाठी मैदानात उतरल्या आहेत.

संजय राऊतांना अटक झाली त्याच दिवशी राहुल गांधीनी ट्वीट करत त्या घटनेचा निषेध केला होता. तर आज प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत संजय राऊतांना पाठिंबा दर्शवत भाजपवर घणाघाती टीका केली आहे. “धमक्या, कपट, फसवेगिरी करून सत्ता बळकावणं आणि लोकशाही चिरडणं हे भाजपचं एकमेव ध्येय आहे. संजय राऊत भाजपच्या फसव्या राजकारणाला घाबरत नसून भाजपला तोंडघशी पाडल्यानं त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाला आहे”, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईवर आपला रोष व्यक्त केला आहे.

हेही वाचा –ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊतांसाठी राहुल गांधी मैदानात, ट्विट करुन भाजप सरकारला इशारा

संजय राऊतांना दिलासा नाहीच

पत्राचाळ पुनर्विकास आणि एफएसआयमधील कथित घोटाळा प्रकरणात अटकेत असणाऱ्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने कुठल्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही. त्यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आणखी चार दिवस ईडी कोठडीत काढावे लागणार आहे.

राहुल गांधींही संजय राऊतांच्या बाजुने, मोदींवर टीका

संजय राऊतांच्या अटकेवरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यावरुन टीका केली आहे. राजाचा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्या विरोधात बोलेल त्याला त्रास सहन करावा लागेल. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधकांचं धैर्य तोडणं आणि सत्याचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हुकूमशाहनं हे लक्षात घ्यावं शेवटी सत्याचा विजय होईल आणि अहंकार पराभूत होईल, असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा –संजय राऊतांची ती ‘डायरी’ अडचणी वाढवणार, कुणाला पैसे दिले याचा कोडवर्डमध्ये उल्लेख, ईडीचा दावा

शरद पवार गप्प का?

संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. संजय राऊतांना अटक झाल्यापासून राष्ट्रवादीकडून ना शरद पवार, ना विरोधीपक्ष नेते अजित पवार, ना जयंत पाटील कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत राज्यसभेत हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही आज चार दिवसांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यातही त्यांनी उघड प्रतिक्रिया न देता संजय राऊतांना लवकरात लवकर जामीन मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यासर्व प्रकरणावर राष्ट्रवादी गप्प का हा मोठा प्रश्न आहे.

शिंदे गटाने वारंवार संजय राऊतांवर अनेक आरोप केलेत. संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं असा दावा केला. राष्ट्रवादी आणि संजय राऊतांची जवळीक यामुळेच शिंदे गटाने इतकं मोठं बंड पुकारलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे सरकार राज्यात आलं. तरीही शिंदे गटाकडून वारंवार संजय राऊतांवर टिकास्त्र सोडले जात होते. आता त्यांच्यावर इतकी मोठी कारवाई झाली, अशा परिस्थितीत शरद पवार आणि राष्ट्रवादीने गप्प राहाणे किती योग्य आहे, असा प्रश्न आहे. राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका आश्चर्यकारक आहे.

हेही वाचा –संजय राऊतांबाबत विचारल्यावर भुजबळ म्हणाले – ‘ईडीच्या केसमध्ये लवकर जामीन मिळत नाही’

छगन भुजबळांकडून शरद पवारांवरील चर्चांवर प्रतिक्रिया

शरद पवार हे संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर गप्प आहेत, या चर्चेत काही तथ्य नाही. असं काही नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याबाबत बोलत आहेत. सुप्रिया सुळे देखील याबाबत बोलल्या, असंही छगन भुजबळ म्हणाले.

राऊतांना ‘ईडी’कडून अटक; मुख्यमंत्री म्हणाले, “ते आम्हालाही जेलमध्ये घालणार होते…”Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: