राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सपना बाबर आणि मनोज गुंजाळ यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सपना सुरेश बाबर आणि मनोज विष्णू गुंजाळ यांना वर्ष 2019-20 राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान Rashtriya Seva Yojana Swayamsevak Sapna Suresh Babar and Manoj Vishnu Gunjal awarded Rashtriya Seva Yojana for the year 2019-20
नवी दिल्ली, PIB Mumbai,25/09/2021-

महाराष्ट्रातील दोन एनएसएस स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2019-20 ने गौरवण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून विविध उपक्रम आणि प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अकोला येथील एल.आर.टी.वाणिज्य महाविद्यालयातली एनएसएस स्वयंसेविका सपना सुरेश बाबरने सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना,महिला सक्षमीकरणाच्या योजना,उज्ज्वला योजना,प्रधानमंत्री जन धन योजना, कौशल्य विकास,तंबाखूमुक्त अभियान आणि रस्ते सुरक्षा सप्ताह अशा योजनांचा तिने दत्तक घेतलेल्या गावात आणि अकोल्यातील झोपडपट्टी भागात प्रचार आणि जनजागृती केली आहे. त्याशिवाय सपनाने अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एड्स जनजागृती रैलीतही सहभाग घेतला आहे. सपनाला जिल्हा, विद्यापीठ आणि राज्य पातळीवर देखील सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून गौरवण्यात आले आहे.

पुण्याजवळ आकुर्डी इथल्या रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिकणारा, मनोज विष्णू गुंजाळने समाजहिताच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. यात जलसंधारण, हरित गावे, अवयव दान शिबिरे, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवनबीमा योजना, उज्ज्वला योजना,प्रौढ शिक्षण, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर अशा योजनांमध्ये सहभाग घेतला आहे. त्याशिवाय, त्याने हिवाळी शिबिरे, राज्य सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेली आपत्ती व्यवस्थापन विषयक उत्कर्ष, आव्हान शिबिरातही भाग घेतला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या वृक्षारोपण अभियानासाठीच्या विद्यापीठ स्तरीय आयोजन समितीचाही तो सदस्य होता.

या समारंभात बोलतांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की,मानवी आयुष्याची इमारत विद्यार्थी दशेतील पायावरच उभी राहते . अध्ययन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असली तरीही व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात विद्यार्थी दशेपासूनच होते. त्याच दृष्टीने एनएसएस ही अत्यंत दूरदर्शी योजना आहे जिथे विद्यार्थ्यांना समाजाची आणि देशाची सेवा करण्याची संधी शाळा, महाविद्यालयातही मिळते.

   यावेळी बोलतांना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि कोविड काळात केलेल्या सेवाकार्याबद्दल, एनएसएसच्या स्वयंसेवकांचे कौतुक केले. ग्रामीण विकास योजना, लसीकरण मोहीम, रक्तदान शिबिर आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात केलेल्या सेवांचे त्यांनी कौतुक केले. युवा देशाचे भविष्य आहेत, असा पुनरुच्चार करत राष्ट्र उभारणीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे,असे त्यांनी सांगितले आणि अधिकाधिक युवकांनी पुढे यावे व ग्रामीण भागात सेवा कार्य करावे असे आवाहन ठाकूर यांनी केले.

   यावेळी 3 विविध विभागांमधील, 42 जणांना पुरस्काराने गौरवण्यात आले.यात विद्यापीठ/ + 2 समित्या, एनएसएस विभाग आणि त्यांचे कार्यक्रम अधिकरी,एनएसएस स्वयंसेवकांना पुरस्कार मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: