आता मुंबै बँकेत होणार सत्तांतर, तिजोरीच्या चाव्या पुन्हा भाजपकडे? आज होणार जाहीर


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः राज्याच्या सत्तासंघर्षात शिंदे सरकारची स्थापना झाल्यानंतर आता त्याचे पडसाद मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही (मुंबै बँक) उमटणार आहेत. या सत्तासंघर्षानंतर मुंबै बँकेच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा भाजपकडे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अध्यक्षपदाची माळ भाजप आमदार प्रवीण दरेकर किंवा प्रसाद लाड यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता सध्या समोर येते आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, आज शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल.

राज्यात झालेल्या सत्तातंरानंतर मुंबै बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यामुळे मुंबै बँकेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे उभ्या मुंबईचे लक्ष लागून राहिले होते. त्यासाठी येत्या ५ ऑगस्टला मुंबै बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. या बैठकीत अध्यक्षपदाची मदार पुन्हा एकदा भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे सोपवली जाईल, अशी शक्यता आहे. मात्र मुंबै बँकेतील घोटाळा लक्षात घेता त्यांच्याऐवजी प्रसाद लाड यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाकडे मुंबै बँकेचे अध्यक्षपद देण्यात येते याबाबत राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

सध्या २१ संचालक

मुंबै बँकेत सध्याच्या घडीला २१ संचालक आहेत. त्यापैकी मजूर विभागातील प्रवीण दरेकर यांचे पद अपात्र ठरवण्यात आल्याने आता संचालकांची संध्या २० झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून १० संचालक आहेत. अध्यक्षपदासाठी ११ मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरणार असून त्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अध्यक्षपद भाजपच्या पारड्यात पडेल, अशी शक्यता आहे. महाविकास आघाडीची सत्ता असतानाच मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी सूत्रे हलवत भाजपाला धक्का दिला होता. मात्र आता अवघ्या सहा महिन्यांतच नव्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: