Rahul Gandhi: देशातील संस्थांवर RSS चा ताबा, विरोधात बोललं की ईडी-सीबीआय तुटून पडतात: राहुल गांधी
सध्याच्या घडीला देशातील सर्व यंत्रणा सरकारला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे, या संस्थांमध्ये भाजपने आपले लोक बसवून ठेवले आहेत. निवडणूक आयोगापासून ते न्यायपालिकेपर्यंत एकही यंत्रणा आताच्या घडीला स्वायत्त राहिलेली नाही. प्रत्येक संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत. त्यामुळे काँग्रेस फक्त एका राजकीय पक्षाशी लढत नाही, तर संपूर्ण व्यवस्थेशी लढत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. आमच्या सरकारच्या काळात या सगळ्या संस्थांचे इन्फ्रास्ट्रक्टर हे न्युट्रल असायचे. आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करायचो नाही. त्यावेळची लढाई ही दोन ते तीन राजकीय पक्षांमधील होती. पण सध्या सरकारी संपूर्ण संस्थात्मक यंत्रणा एका पक्षासोबत आहे. कोणीही दुसऱ्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला की त्याच्यापाठी ईडी आणि सीबीआय लागतात. त्यांना धमकावले जाते, घाबरवले जाते. त्यामुळे देशात सध्या राष्ट्रीय स्वयसंसेवक संघाची आर्थिक आणि संस्थात्मक एकाधिकारशाही आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
या सगळ्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमकतेने आणि प्रभावीरित्या उभा राहत आहे. मात्र, याचा परिणाम जितका दिसला पाहिजे तितका दिसत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले. देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. पण केंद्र सरकार ही बाब मान्य करायला तयार नाही. मी या सगळ्या गोष्टींवर जितकं अधिक बोलेन, माझ्यावरील हल्ले तितके अधिक तीव्र होतील. जो सतत धमकावतो, तो घाबरत असतो. आपला खोटेपणा जनतेसमोर उघडा पडू नये, याची केंद्र सरकारला भीती आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
कोणतीही व्यक्ती, फिल्मस्टार भाजपविरोधात बोलला की, सरकारी यंत्रणा त्याच्यावर तुटून पडतात: राहुल गांधी
मी केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर माझ्यावर आक्रमणं केली जातात. पण मला चांगले वाटते, कारण या आक्रमणांमधून मी काहीतरी शिकत असतो. त्यामुळे भाजप माझ्यावर जितका हल्ला करेल, तितका माझा फायदा होईल. भारतात कोणतीही व्यक्ती मग ती राजकीय पक्षाची असो किंवा नसो, फिल्मस्टार असो, कोणीही, सरकारविरोधा काही बोलला तर त्याच्यावर सर्व सरकारी यंत्रणा तुटून पडतात. हा फक्त एकट्या काँग्रेस पक्षाचा प्रश्न नाही. देशात आजघडीला लोकशाही उरलेली नाही. लोकशाही ही केवळ एक आठवणीचा भाग उरली आहे. या सगळ्याचे विध्वंसक परिणाम पाहायला मिळतील, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.