कुस्तीमध्ये भारताला सलग दुसरे सुवर्णपदक, बजरंगनंतर साक्षी मलिकने मारली बाजी
बजरंगने पटकावले सुवर्णपदक
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. बजरंगने यावेळी अंतिम फेरीत ९-२ असा विजय साकारला आणि देशाला सुवर्णपदक जिंकवून दिले. भारताला कुस्तीमध्ये या स्पर्धेत मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगला ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागले नाही आणि त्याने देशासाठी सहज सुवर्ण जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचे आव्हान होते. हा सामना ९-२ असा जिंकून बजरंगने सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे दुसरे आणि एकूण तिसरे सुवर्ण आहे. २०१८ मध्येही त्याने ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. २०१४ मध्ये त्याने ६१ किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्येही त्याची दोन सुवर्णपदके आहेत. या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे सातवे सुवर्ण आणि एकूण २२ वे पदक आहे. कुस्तीमध्ये बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्यपदक जिंकले होते.
अंशु मलिकला रौप्यपदक
भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिकने आज रौप्यपदकाची कमाई केली. अंशु ही राष्ट्रकुलमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली कुस्तीपटू ठरली आहे. अंशुचे सुवर्णपदक यावेळी फक्त दोन गुणांनी हुकले. तिला अंतिम फेरीत ४-६ असा पराभव पत्करावा लागला. महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये तिची गाठ ओडुनायो फोलसाडे अडेकुरोयेबरोबर होती. अंशू मलिकने येथे सुरुवातीला ती थोडी बचावात्मक दिसत होती. त्यामुळे तिला सुरुवातीचा गुण कमावता आले नाही. पण या गोष्टीचा चांगलाच फायदा नायजेरियन कुस्तीपटूने उचलला आणि सामन्यात २-० अशी आघाडी घेतली होती.