९ केंद्रीय मंत्री, १६ लोकसभा मतदारसंघ, १८ महिन्याचं तगडं नियोजन, भाजपचा लोकसभा ‘विशेष’ प्लॅन


ठाणे : केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्यात की नाही याची पाहणी करण्यासाठी ९ केंद्रीय मंत्री हे महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघात प्रवास करणार आहेत. या प्रवासात कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्ष संघटनेवर विशेष भर दिला जाणार आहे. याच लोकसभा मिशनची माहिती देण्याकरिता भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली.

महाराष्ट्रातल्या १६ लोकसभा मतदार संघात ९ केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. १८ महिन्यांचा हा प्रवास असेल. या १८ महिन्यात ६ वेळा केंद्रीय मंत्री महाराष्ट्र दौरा करणार आहेत. प्रत्येक प्रवास हा ३ दिवसांचा मुक्कामी प्रवास असणार आहे. या ३ दिवसांच्या प्रवासात २१ कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे. या काळात पक्षीय बदल, स्थानिक पातळीवरील अडी अडचणी, संघटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित आहेत.

या ३ दिवसीय मुक्कामी प्रवासात कल्याण लोकसभेत आणि मध्य मुंबईत केंद्रीय मंत्री अनुरागसिंग ठाकूर, दक्षिण मुंबईमध्ये नारायण राणे, पालघरमध्ये विश्वेश्वर तुडू, रायगड आणि शिर्डी मतदारसंघात प्रल्हाद पटेल, बारामतीला निर्मला सीतारमण, औरंगाबाद आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भूपेंद्र यादव, चंद्रपूरला हरदीपसिंग पुरी या केंद्रातील प्रभावी मंत्र्यांवर संबंधित लोकसभा मतदार संघाची जबाबदारी असणार आहे.

भाजपच्या कार्यक्रमांमध्ये धार्मिक स्थळांना भेटी, आध्यात्मिक गुरुंच्या गाठीभेटी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी, सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते, व्यापारी, वकील डॉक्टर यांच्या वेगवेगळ्या बैठका, पत्रकार संवाद, सर्व स्तरावरील संघटनात्मक, शासकीय अधिकारी यांच्या बैठका तसेच स्वस्त धान्याच्या दुकानात देखील केंद्रीय मंत्री भेट देणार आहेत. केंद्र सरकारकडून राबवलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत नीटपणे पोहोचत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जागोजागी जातील.

भाजपचा लोकसभा विशेष प्लॅन, पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याची निर्मला सीतारमण यांच्याकडे जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपनं मिशन २०२४ हाती घेतलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १४१ जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. या जागा जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांवर १४१ जागांची जबाबदारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत हे मंत्री त्यांना देण्यात आलेल्या मतदारसंघांत जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि रणनीती आखतील. २०१९ मध्ये भाजपचा १४ मतदारसंघांमध्ये पराभव झाला. या जागा जिंकण्यासाठी भाजपनं चार समूह तयार केले आहेत. या १४ मतदारसंघात सध्या समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसचे खासदार आहेत.

रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे सहारणपूर, नगीना आणि बिजनौरची जबाबदारी देण्याकडे आली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे रायबरेली, मऊ, घोसी, श्रावस्ती आणि आंबेडकर नगरची जबाबदारी दिली गेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे मुरादाबाद, अमरोहा आणि मैनपुरीमध्ये लक्ष घालतील. राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे जौनपूर, गाझीपूर आणि लालगंज मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे पंजाबचे लुधियाना, संगरुर आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावतांकडे पंजाबच्या आनंदपूर साहिब मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीला खिंडार पाडण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: