एलन मस्क यांनी एकाच दिवसात कमावले ३७,४२२ कोटी रुपये; जेफ बेझोस पडले पिछाडीवर
टेस्लाचे शेअर्स शुक्रवारी २.७५ टक्क्यांनी वाढले. यामुळे, एका दिवसात मस्क यांची संपत्ती ५.०७ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ३७,४२२ कोटी रुपयांनी वाढली आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत ३९.१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. बेझोस यांची संपत्ती शुक्रवारी ४६२ दशलक्ष डॉलरनी वाढली. या वर्षी त्यांची संपत्ती ७.६५ अब्ज डॉलरने वाढली आहे. टेस्ला ही जगातील सर्वात मूल्यवान वाहन कंपनी आहे. विश्लेषकांचे म्हणणं आहे की, कंपनीचा शेअर त्याच्या वास्तविक मूल्यापेक्षा अधिक किंमतीचा आहे.
झुकेरबर्गनी बिल गेट्सना टाकलं मागे
फ्रेंच व्यापारी आणि जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तूंची कंपनी LVMH Moët Hennessy चे अध्यक्ष बर्नार्ड अर्नाल्ट (१६२ अब्ज डॉलर) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे अमेरिकन मीडिया दिग्गज आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग हे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. झुकेरबर्ग यांची संपत्ती १३१ अब्ज डॉलर आणि गेट्स यांची १२९ अब्ज डॉलर एवढी आहे. शुक्रवारी झुकेरबर्ग यांची संपत्ती २.५४ अब्ज डॉलरने वाढली, तर गेट्स यांची संपत्ती ३.१७ अब्ज डॉलरने कमी झाली.
जगातील टॉप-१० श्रीमंत व्यक्ती
अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि इंटरनेट उद्योजक लॅरी पेज १२७ अब्ज डॉलर्ससह सहाव्या, गूगलचे सह-संस्थापक सेर्गेई ब्रिन १२२ अब्ज डॉलरसह सातव्या, अमेरिकन व्यापारी आणि गुंतवणूकदार स्टीव्ह बाल्मर १०७ अब्ज डॉलर्ससह आठव्या, लॅरी एलिसन १०४ अब्ज डॉलरसह नवव्या आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट १०१ अब्ज डॉलर संपत्तीसह दहाव्या स्थानावर आहेत. जगातील पहिल्या १० श्रीमंतांपैकी ९ जण हे अमेरिकेतले आहेत.
अंबानी-अदानी टॉप-१५ मध्ये
दरम्यान, देशातील सर्वात मूल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स शुक्रवारी (२४ सप्टेंबर) किरकोळ घसरले. यामुळे कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची संपत्ती १५.५ कोटी डॉलरने कमी झाली. आशिया आणि भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती ९५.३ अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते ११ व्या स्थानावर आहेत. तसेच अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी ६८.३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १४ व्या क्रमांकावर आहेत. अंबानींनंतर ते भारत आणि आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी अदानी यांच्या संपत्तीत ३४.५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.