‘आनंदराव अडसुळांवरील ED कारवाई मराठी माणसांना न्याय देणारी’


हायलाइट्स:

  • शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात
  • सिटी को-ऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहारांप्रकरणी कारवाई
  • आमदार रवी राणा म्हणाले, कारवाई योग्यच!

मुंबई: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सक्तवसुली संचालनालयानं (ED) छापा टाकला असून अडसूळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील गैरव्यवहारांच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रार करणारे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी ईडीच्या कारवाईचं स्वागत केलं आहे. ‘अडसुळांवरील कारवाई योग्यच असून ईडीनं मराठी खातेदारांना न्याय देणारं पाऊल उचललं आहे,’ असं राणा यांनी म्हटलं आहे. (ED Raids at Anandrao Adsul House)

रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील वडनेरा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा अमरावतीच्या खासदार आहेत. अडसूळ यांचा पराभव करून त्या लोकसभेत गेल्या आहेत. राणा व अडसूळ हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही बाजूंकडून कुरघोडीचे राजकारण सुरू असते. नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राविरोधात अडसूळ यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर, सिटी को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात रवी राणा यांनी ईडीकडं तक्रार केली होती. ईडीच्या आजच्या कारवाईनंतर लगेचच त्यांनी प्रतिक्रिया दिली. राणा यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले.

वाचा: ईडीच्या चौकशीदरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली

‘मुंबई शहरात सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १४ शाखा आहेत. त्या बँकेत ९० टक्के खातेदार हे मुंबईतील मराठी बांधव आहेत. गिरणी कामगार, डबेवाले, सर्वसामान्य लोक, निवृत्ती वेतनधारकांचा या खातेधारकांमध्ये समावेश आहे. मुलांची लग्नं, आजारपण व शिक्षणासाठी अनेक लोकांनी बँकेत ठेवी ठेवल्या होत्या. सुमारे ९८० कोटी रुपयांच्या या ठेवी होत्या. मात्र, तीन वर्षांपूर्वी अचानक सिटी बँक बुडाल्याची आवई उठवली गेली. तेव्हापासून लोक आपल्या पैशासाठी चकरा मारत आहेत. काही लोकांना जीवही गमवावा लागलाय. त्यासाठी बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ जबाबदार आहेत. बँकेच्या पाच-सहा शाखांच्या मालमत्ता मुलगा आणि जावयाच्या नावानं आहेत. त्या मालमत्ता बँकांना भाड्यानं दिल्या आहेत. अडसूळ यांनी खातेदारांची फसवणूक केलीय. एक कोटीची मालमत्ता असलेल्या बिल्डरांना पाच कोटींचे कर्ज दिले. पाच कोटींची मालमत्ता असलेल्या ठेवीदारांना २० कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्यात अडसूळ यांना २० टक्के कमिशन मिळालं आहे. या सगळ्या कारभारामुळं अखेर बँक बुडाली. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडं तक्रार करण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्यानं कारवाई झाली नाही. फाइल दाबून ठेवली गेली. आता ईडीनं निष्पक्षपातीपणे कारवाई केली. त्याचं मी स्वागत करतो,’ असं राणा यांनी म्हटलं आहे.

वाचा: कोल्हापुरात गॅस गळतीमुळं भीषण स्फोट; घराचे छत कोसळून दोन जखमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: