वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले
गणेश सोलनकर हे लोक अदालत असल्याने समन्स बजावण्यासाठी गेले असताना गोनेवाडी-शिरशी मार्गावर हॅट्सन डेअरीजवळ ही घटना घडली.समन्स बजावून गणेश हे गावच्या पोलीस पाटलांना डेअरीजवळ येण्यास सांगून वाट पाहत असताना त्यांना समोरून वाळू भरून येणारा टेम्पो दिसला. त्यांनी त्याला हात करून थांबण्यास सांगितले असता टेम्पो चालकाने गाडी न थांबविता त्यांच्या थेट अंगावर घातली आणि त्यातच पोलीस कर्मचारी गणेश सोलनकर ( वय ३२ )यांचा चिरडून मृत्यू झाला. पोलीस कर्मचारी सोलनकर चिरडले असल्याचे समजताच चालकाने टेम्पो तसाच ठेऊन पळ काढला. ही घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह टीम मंगळवेढ्यात रुग्णालयात पोहोचली. हॉस्पिटलमध्ये पोलीस कर्मचारी,अधिकारी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. वाळू माफिया टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अप्पर अधीक्षक जाधव यांनी सांगितले.