तंबाखूमुक्त शासकीय कार्यालय अभियान – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला पुढाकार

तंबाखूमुक्त शासकीय कार्यालय अभियान – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला पुढाकार
        यवतमाळ /जि.मा.का. :  जिल्ह्यात "तंबाखूमुक्त शासकीय कार्यालय" हे अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना पत्र देवुन त्यांचे अधिनस्त येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयात "तंबाखूमुक्त कार्यालय अभियान" राबविण्याचे आवाहन केले आहे. 

तंबाखूमुक्त शासकीय कार्यालय या अभियानांतर्गत सर्व कार्यालयामध्ये दर्शनीय भागावर “तंबाखू निषिध्द क्षेत्र” व कार्यालय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांवर, बाळगणाऱ्यांवर रुपये 200 इतका दंड करण्या बाबतचे फलक लावण्याचे व प्रवेशद्वारावर तंबाखू त्याग पेटी ठेवणेबाबतच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आलेल्या आहे.तसेच केलेल्या कार्यवाहीचा मासिक अहवाल राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, यवतमाळ यांना सादर करण्यास सूचित केले आहे.

          राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध प्रसार माध्यमांद्वारे व शिबीरांच्या माध्यमातून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात येते. सदरील कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत राबविण्यात येतो. या कार्यक्रमा अंतर्गत दंत शल्य चिकित्सक यांच्या द्वारे मौखिक आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात येते तसेच मौखिक कर्करोग व संशयित रुग्णांना योग्य मार्गदर्शन व पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या नागरिकांचे समुपदेशकांमार्फत समुदेशन करुन त्यांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणेकरीता प्रोत्साहित केले जाते. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा इ. विविध कार्यक्रमां च्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परीणामांबाबत जनजागृती करण्यात येते आणि तंबाखू मुक्त शाळा/महाविद्यालय अभियान व येलो लाइन कॅम्पेन असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात "तंबाखूमुक्त शासकीय कार्यालय" हे अभियान राबविण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे यांनी कळविले आहे.

सर्व शासकीय कार्यालयात तंबाखूमुक्त कार्यालय अभियान राबविताना शासकीय कर्मचारी यांनीच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन बंद केले तरच हे अभियान यशस्वीपणे राबवले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: