अनिल परब ईडी चौकशीसाठी कार्यालयात हजर; म्हणाले…
हायलाइट्स:
- अनिल परब यांना ईडीचे समन्स
- चौकशीसाठी उपस्थित राहणार
- ईडीला सहकार्य करणार असल्याची भूमिका
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल परब यांना ईडीने दोनदा समन्स बजावले होते. याआधी ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल परब यांनी चौकशीसाठी १४ दिवसांची मुदत मागितली होती. ईडीने ही विनंती मान्य केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स बजावले होते. त्यानुसार अनिल परब आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यामांसोबत संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला ईडीचे दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. मी शिवसेना प्रमुखांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगितलं आहे की मी कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम केलेलं नाही. चौकशीला मला जे प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर दिली जातील. मला अजूनही चौकशीसाठी का बोलवलं आहे हे मला माहिती नाही. पण चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य ठेवण्याची माझी भूमिका असेल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
अनिल परब यांच्यावर आरोप काय?
अनिल देशमुखप्रकरणी काही जणांची चौकशी करण्यात आली. विशेषत: बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली. या माहितीनुसार, या प्रकरणात अनिल परब यांचादेखील सहभाग असल्याचा संशय आहे. मुंबई महापालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना अनिल परब यांनी जानेवारी २०२१ मध्ये दिली होती, असे वाझे याने न्यायालयालाही सांगितले आहे. या सर्व माहितीनुसार, यामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा संशय आहे. त्यामुळेच प्रकरणाच्या प्रत्यक्ष चौकशीसाठी परब यांना हा समन्स बजावण्यात आला आहे.