‘धनंजय मुंडेंना पुढच्या १० निवडणुका कोणी हरवू शकत नाही’
हायलाइट्स:
- परळीत जयंत पाटील यांची तुफान फटकेबाजी
- धनंजय मुंडे यांचं केलं तोंडभरून कौतुक
- धनंजय मुंडे यांच्या पाठीशी कायम राहण्याचं परळीकरांना केलं आवाहन
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं जयंत पाटील परळीत आहेत. परळीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळं जयंत पाटील हे भारावून गेले. आपल्या भाषणात त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला. ‘परळीत आल्यानंतर करोना पूर्ण गेल्याची माझी खात्री झाली. परळी मतदारसंघातील पहिल्या गावापासून मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मी माझ्या लग्नाची वरात कधी काढली नव्हती. भविष्यात अशा वराती बऱ्याच निघणार आहेत, असं मी बायकोला म्हटलं होतं. ते आज खरं ठरलं,’ अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.
वाचा: ‘येत्या चार महिन्यांत महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ दवाखान्यात असेल’
पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या कामाचं जोरदार कौतुक केलं. मुंडे यांच्यासारखा हिरा शरद पवार साहेबांनी ओळखला आणि त्यांना विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते पदाची संधी दिली. मुंडे यांनी त्या भूमिकेला न्याय दिला. लहान वयात अतिशय प्रभावीपणे काम केलं. त्यांच्याकडं दूरदृष्टी आहे. विकासाच्या बाबतीत परळी पहिल्या पाचमध्येच नाही तर पहिल्या क्रमांकावरही येऊ शकते. त्यासाठी धनंजय मुंडे यांच्यासारखा हिरा परळीकरांनी तळहाताच्या फोडासारखा जपायला हवा,’ असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. ‘बारामतीची जनता शरद पवार व अजित पवार यांच्या मागे सतत उभी राहिली म्हणून बारामतीचा विकास झालाय. महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघाचं नेतृत्व जनतेनं जपलाय, त्या मतदारसंघाचा विकास झालाय हा इतिहास आहे,’ असं पाटील म्हणाले. ‘गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एक लढवय्या नेता मिळाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडे हे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात. गोपीनाथरावानंतर या मतदारसंघाचा नावलौकिक वाढवण्याचं काम एकमेव धनंजय मुंडे हेच करू शकतात,’ असं पाटील म्हणाले.