Kanhaiya Kumar: कन्हय्या कुमार यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री, मनिष तिवारींचा आपल्याच पक्षावर निशाणा
हायलाइट्स:
- काँग्रेसनं फडकावले कन्हय्या कुमार यांचं स्वागत करणारे पोस्टर्स
- ट्विटमध्ये कुमारमंगलम यांच्या ‘कम्युनिस्ट इन काँग्रेस’ पुस्तकाचा उल्लेख
- मनिष तिवारी काँग्रेस नेतृत्वाला काय सुचवू इच्छितात?
आज दुपारी कन्हय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या दाखल होऊ शकतात. यावेळी पक्षाचे मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कन्हय्या कुमार यांच्या पक्षातील स्वागतासाठी काँग्रेसच्या कार्यालयात जय्यत तयारी करण्यात आलीय. कार्यालयाच्या बाहेर मोठमोठे पोस्टरही लावण्यात आलेत. यावर, कन्हय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांचं स्वागत करण्यात येत असल्याचं म्हटलं गेलंय.
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनीष तिवारी यांनी मात्र अप्रत्यक्षरित्या कन्हय्या कुमार यांच्या पक्षातील एन्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
‘काही कम्युनिस्ट नेते काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी १९७३ मध्ये छापण्यात आलेली ‘कम्युनिस्ट इन काँग्रेस‘ वाचायला हवं. गोष्टी जेवढ्या बदलतात तेव्हढ्याच त्या सारख्या वाटायला लागतात. आज हे पुन्हा एकदा वाचून काढतो’, असं आपल्या ट्विटमध्ये मनिष तिवारी यांनी म्हटलंय.
या ट्विटमध्ये मनिष तिवारी यांनी कम्युनिस्ट विचारधारेशी संबंधीत राहिलेल्या कुमारमंगलम यांचं पुस्तक ‘कम्युनिस्ट इन काँग्रेस’चा उल्लेख केला आहे.
कन्हय्या कुमार यांना बिहारमध्ये काँग्रेसकडून मोठी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. या रणनीतीनुसार, येत्या काही दिवसांत काँग्रेसशी आणखी काही तरुण नेते जोडले जाण्याची शक्यता आहे.