ब्रिटनमधील ९० टक्के पेट्रोल पंप बंद; ‘या’ कारणाने अभूतपूर्व इंधन संकट
ब्रिटनमध्ये इंधन टंचाईचे मोठे कारण हे ब्रेक्झिट आणि ट्रक चालकांची कमतरता असल्याचे सांगितले जाते. यामुळे ब्रिटनची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. रिफायनरीमधून पेट्रोल पंपापर्यंत इंधन पुरवठा होत नाही. मोठ्या संख्येने ट्रक रस्त्याच्या दुतर्फा उभे आहे. मात्र, ट्रक चालवण्यासाठी वाहन चालकच नाहीत. इंधनाच्या तुटवड्यामुळे ब्रिटनमध्ये हाहा:कार उडाला आहे.
सरकारकडून प्रयत्न सुरू
ब्रिटिशचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने खाद्यपदार्थांच्या तुटवड्याला रोखण्यासाठी लाखो पौंड खर्च करणार आहे. लोकांनी घाबरून अन्नधान्याचा अनावश्यक साठा करू नये यासाठी सरकारने आवाहन केले आहे.
६० ते ९० टक्के पेट्रोल पंप बंद
रविवारी ब्रिटनमध्ये अनेक पेट्रोल पंप बंद करण्यात आले होते. गॅस स्टेशनवरही अशीच परिस्थिती असल्याचे दिसून आले. ब्रिटनमधील पेट्रोल पंप विक्रेत्यांची संघटना पेट्रोल रिटेलर्स असोसिएशन यांनी सांगितले की, काही भागांमध्ये ६० ते ९० टक्के पेट्रोल पंप ठेवावे लागले आहेत. या पेट्रोल पंपावर इंधन आणि गॅस पुरवठा ठप्प झाला आहे.
परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कर उतरवणार?
‘द टाइम्स’ आणि ‘फायन्शिअल टाइम्स’च्या वृत्तानुसार, इंधन पुरवठा सुरू करण्यासाठी ब्रिटिश सरकार लष्कराची मदत घेण्याच्या विचारात आहे. मात्र, पेट्रोल पंप विक्रेत्यांनी याचा काही उपयोग होणार नसल्याचे म्हटले. इंधन टंचाई दूर करण्यासाठी जवळपास १० हजार ट्रक चालकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी नवीन चालकांना प्रशिक्षण देणे आणि परवाना देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.