Murder Mystery: आंतरराष्ट्रीय बायकरचा मृत्यू : सामान्य मृत्यू नाही तर हत्या, तीन वर्षानंतर खुलासा
हायलाइट्स:
- असबाक मोन हा मूळचा केरळच्या कन्नूरचा रहिवासी
- १६ ऑगस्ट २०१८ रोजी असबाकचा मृत्यू
- हत्येत पत्नी – मित्रांची काय भूमिका होती, याची पोलिसांकडून चौकशी सुरू
जवळपास तीन वर्षांपूर्वी ‘इंडियन बाजा मोटरस्पोर्टस डकार चँलेंज रॅली’ दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर बायकर म्हणून ओळख मिळवणारा ३४ वर्षीय असबक मोन जैसलमेरमध्ये दाखल झाला होता. इथेच त्याचा मृत्यू झाला होता.
काय घडलं त्या दिवशी?
असबाक हा मूळचा केरळच्या कन्नूरचा रहिवासी होता. काही वर्षांपासून तो बंगळुरूच्या आरटी नगरमध्ये स्थायिक झाला होता. बंगळुरूमध्ये येण्यापूर्वी तो काही दिवस दुबईतही राहत होता.
१५ ऑगस्ट २०१८ रोजी शाहगढ बल्जमध्ये रायडिंग ट्रॅक पाहणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट २०१८ रोजी असबाक आपल्या मित्रांसोबत रायडिंगसाठी निघाले होते. या दिवशी असबाकशिवाय सर्व परतले. यानंतर दोन दिवसांनी असबाकचा मृतदेह आढळला. यावेळी त्याची बाईक स्टँडवर उभी केलेली होती तसंच त्यावर हेल्मेटही ठेवण्यात आलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, या जागेवर मोबाईल नेटवर्क नव्हतं.
तो नैसर्गिक मृत्यू नव्हता?
असबाक आणि त्याचे मित्र बाईक रायडिंग दरम्यान वाळवंटात रस्ता भटकले आणि एकमेकांची साथ सुटल्याचं, असबाकच्या मित्रांनी माहिती दिली होती. डिहायड्रेशन किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे असबाकचा रस्त्यातच मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. पोलिसांनीही प्राथमिकदृष्ट्या हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं मानलं होतं. मात्र, मृताच्या भावानं आणि आईनं हत्येची शंका उपस्थित केलं होती.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांच्या तपासणीत हा नैसर्गिक मृत्यू नसून ही हत्या असू शकते, असा संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी असबाकच्या दोन मित्रांना गेल्या सोमवारी अटक केलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असबाक मोन पत्नी सुमेरा परवेज आणि संजय, विश्वास, नीरज, साबिक आणि संतोष या पाच मित्रांसोबत जैसलमेरमध्ये दाखल झाला होता. असबाकचे त्याच्या पत्नीसोबत अनेक विषयांवर वाद सुरू असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं. असबाकच्या मृत्यूच्या दिवशी त्याचा मित्र संजय सर्वात अगोदर घटनास्थळी दाखल झाला होता. तिथून त्यानं असबाकचा मोबाईल आणि इतर सामान आपल्या ताब्यात घेतलं होतं.