महाराष्ट्र दिनी जैन समाजाने केली मुक्या जनावरांसाठी पाणपोई
महाराष्ट्र दिनी जैन समाजाने केली मुक्या जनावरांसाठी पाणपोई On Maharashtra Day, Jain community made Paanpoi for domestic animals
सोलापूर ,01/05/2021- जगाला आहिंसेचा मार्ग दाखवणारे ,जगा आणि जगू द्या असा संदेश देणारे जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व थोर पुरुषांच्या जयंत्या, विविध कार्यक्रम शासनाने स्थगित केले आहेत. भगवान महावीरांचा जन्म कल्याणक महोत्सवाचे औचित्य साधून हर्षलभाई कोठारी, श्रेणिकभाई कोचर व परीमलजी भंडारी यांच्या प्रयत्नातून व शाम पाटील यांनी पाठपुरावा केल्याने जैन कासार सोसायटी येथे ही पाणपोई चालू करण्यात आली.

बाजूलाच मोकळे मैदान असून गाई,म्हशींसह कुत्री ,गाढव असे प्राणी भटकंती करत येतात परंतु पाण्याची कुठेच सोय होत नव्हती. यावेळी जैन कासार सोसायटी येथील नागरिकांनी पुढाकार घेतल्याने ही पाणपोई आजपासून चालू करण्यात आली. त्यामुळे मुक्या जनावरांची तहान नक्कीच भागणार आहे.
सोसायटीतील जेष्ठ शिवलाल भस्मे,भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील, सुरेश कासार, प्रा.संतोष यादगिरे,उद्योजक वैभव पाटील ,उद्योजक अमोल जगधने,प्रा.धन्यकुमार बिराजदार, आरटीओ ऑफिसचे पंकज भस्मे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुक्या जनावरांना कोठेही पाण्याची व्यवस्था होत नव्हती अशावेळी जैन समाजाने इंडियन मॉडेल शाळेजवळील कासार सोसायटीत पाणपोई उभी करून जनावरांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रा.संतोष यादगिरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धन्यकुमार बिराजदार यांनी केले.
भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील यांनी कासार सोसायटीतील नागरिकांनी पाणपोई उभी करून जनावरांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सोसायटीच्या सर्व नागरिकांचे आभार भारतीय जैन संघटनेच्यावतीने व्यक्त केले आणि यापुढेही भारतीय जैन संघटना आपल्या सर्व चांगल्या कामासाठी असेच सहाय्य करेल असे सांगितले.