शाळेतील मुलीसोबत चित्रकला शिक्षकाचं संतापजनक कृत्य; कोर्टाने दिला दणका
हायलाइट्स:
- लहान मुलीवर लैंगिक अत्याचार
- कोल्हापुरातील शिक्षकाचं संतापजनक कृत्य
- आरोपीला कोर्टाने सुनावली शिक्षा
आरोपी माने हा एका शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होता. शाळेत शिकवत असताना त्याची पीडित अल्पवयीन मुलीशी विद्यार्थी आणि शिक्षक या नात्याने ओळख होती. पीडित मुलगी घरी आपल्या आईचा मोबाईल वापरत असे. आरोपी माने याने मुलीशी गोड बोलून मोबाईलचा नंबर घेतला. तसेच आरोपीने स्वत:च्या मोबाईलवरुन मुलीच्या मोबाईलवर लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील संदेश व्हॉट्सअॅपवर पाठवले. तसंच पीडित मुलगी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील वॉशरुममध्ये गेली असता आरोपी माने याने खालच्या मजल्यावरुन मुलीकडे पाहून अश्लील हातवारे केले.
मुलीने ही घटना घरी सांगितल्यावर पालकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संजय साळुखे यांनी शितलकुमार माने याच्याविरोधात लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम १३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
जिल्हा सत्र न्यायाधीश महात्मे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील अमित कुलकर्णी यांनी आठ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. कोर्टाने आरोपी माने याला चार वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड ठोठावला. तसंच पीडितेस २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिक्षाही सुनावली.
दरम्यान, विशेष सरकारी वकील कुलकर्णी यांना अॅड भारत शिंदे, अॅड महेंद्र चव्हाण, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक फौजदार शाम बुचडे, अशोक शिंदे, माधवी घोडके यांचे सहकार्य लाभले.