अनिल देशमुख प्रकरण: ED चौकशीचा फेरा मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांपर्यंत
हायलाइट्स:
- अनिल देशमुख प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
- गृहविभागाचे उप सचिव कैलाश गायकवाड यांना समन्स
- आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयनं सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’नंसुद्धा देशमुख यांची चौकशी सुरू केली आहे. ‘ईडी’नं आत्तापर्यंत देशमुख यांना पाच वेळा चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख अद्यापही हजर झालेले नाहीत. त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे.
वाचा: मुंबईकरांचा मेट्रो प्रवास लांबणीवर?; अधिकारी म्हणाले…
अनिल देशमुख यांच्या शोधासाठी ‘ईडी’नं आत्तापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ‘ईडी’ची तीन पथकं एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. लूकआऊटमुळं लवकरच परराज्यात देखील ‘ईडी’कडून शोध सुरू होईल, असं सूत्रांनी स्पष्ट केलं. असं असूनही अद्याप अनिल देशमुख ईडीसमोर आलेले नाहीत. त्याऐवजी त्यांनी न्यायालयात जाण्याचा मार्ग पत्करला आहे.
अनिल देशमुख ईडीसमोर आले नसले तरी त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी ईडीनं सुरू केली आहे. देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकाचीही चौकशी झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सोमवारी ईडीनं चौकशी केली. आता ईडीनं कैलाश गायकवाड यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.
वाचा: साखर कारखान्याच्या अध्यक्षाचं थेट राष्ट्रवादीच्या आमदाराला आव्हान!