बंगाल पोटनिवडणूक : भवानीपूरसहीत ३ जागांवर मतदान सुरू, BJP चा TMC वर गंभीर आरोप
हायलाइट्स:
- भवानीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक
- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल
- भाजपकडून तृणमूल आमदार मदन मित्रा यांच्यावर गंभीर आरोप
दरम्यान भवानीपूरमध्ये भाजप उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. टिबरेवाल यांच्या म्हणण्यानुसार, तृणमूलचे आमदार मदन मित्रा यांनी जबरदस्तीनं वोटिंग मशीन बंद केलं. नागरिकांनी मतदान केलं तर त्यांना आपल्या मनाप्रमाणे निकाल मिळणार नाही. त्यामुळे तृणमूलकडून बूथ कॅप्टरिंगचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप टिबरेवाल यांनी केलाय.
भाजपकडून तृणमूलवर सत्तेच्या दुरुपयोगाचा आरोप करण्यात येतोय. दुसरीकडे भवानीपूरसहीत इतर दोन जागांवर ईव्हीएम सुरक्षेवर नजर ठेवण्यासाठी विशेष वाहनांची सोय करण्यात आलीय. बूथची सुरक्षा पोलिसांच्या हाती देण्यात आलीय. तसंच केंद्रीय दलाच्या १५ कंपन्या इथं तैनात करण्यात आलेल्या आहेत.
ज्या ज्या ठिकाणी आज मतदान होतंय तिथं सुरक्षेसाठी सर्व उपाय करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय. मतदान होणाऱ्या भागांत कलम १४४ लागू करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. या पोटनिवडणुकीचे निकाल ३ ऑक्टोबर रोजी घोषित केले जाणार आहेत.