शाळांना शनिवार दि.एक मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना Instructions to schools to implement summer vacation from Saturday 1st May
मुंबई,दि.१ - राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार दि.१ मे,२०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून या सुट्टीचा कालावधी दि.१३ जून, २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे.
पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार दि.१४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात येतील तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार दि. २८ जून, २०२१ रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त शासकीय-अशासकीय, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत.
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.
माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत,याची दक्षता घेण्यात यावी.
सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोविड-१९ च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील,असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Like this:
Like Loading...