किरीट सोमय्या आज राज्यपालांना भेटणार; राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…
हायलाइट्स:
- किरीट सोमय्या आज राज्यपाल कोश्यारींना भेटणार
- राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली बोचरी प्रतिक्रिया
- भाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या नेत्याला भेटतात यात नवीन काय? – नवाब मलिक
राज्यात महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार आल्यापासून राज्यपाल व सरकारमधील संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी राज्यपालांनी आजवर सोडलेली नाही. तर, राज्य सरकारनंही आपल्या पद्धतीनं राज्यपालांना उत्तर दिलं आहे. भाजपचे नेते प्रत्येक प्रश्नावर राज्यपालांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तक्रारी करत असल्यामुळं हा तणाव सतत वाढत आहे. करोना काळात दर काही दिवसांनी भाजपचे नेते राज्यपालांना भेटत होते व सरकारच्या तक्रारी करत होते. आता पुन्हा एकदा राजभवनवर भेटीगाठींचं सत्र सुरू झालं आहे.
वाचा: रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चिघळणार; अमित ठाकरे म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर एका मागोमाग एक घोटाळ्याचे आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित कथित घोटाळ्याची माहिती ते राज्यपालांना देणार आहेत. त्यांच्या या भेटीची सध्या मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
अनिल देशमुख प्रकरण: ईडीच्या चौकशीचा फेरा मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांपर्यंत
त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप व राज्यपालांवर टीका केली. ‘राज्यपाल भवन हा आता राजकीय अड्डा झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत. भाजपचे कार्यकर्ते त्यांना भेटताहेत. भाजपचे कार्यकर्ते राज्यपालांना भेटताहेत. यात बातमी होण्यासारखं काही नाही, असं मलिक म्हणाले. ‘आपण राज्यपाल या प्रतिष्ठित पदावर आहोत याची जाणीव महाराष्ट्राच्या राज्यपालांना नाही. त्यामुळं ते रोजच्या रोज भाजपच्या लोकांना भेटत असतात. राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झालं आहे,’ असंही मलिक म्हणाले.