आमदार प्रशांत परिचारक यांची भुमिका स्वागतार्ह – तानाजी बागल
पंढरपूर, 30/09/2021 - एकीकडे पंढरपूर तालुक्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत आली असताना आज श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी जे प्रतिपादन केले आहे ते खरोखरच स्वागतार्ह आहे. आज तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा श्री विठ्ठल सहकारी ,भीमा सहकारी बंद आहे तसेच चंद्रभागा सहकारी देखील मोठ्या मुश्किलीने सुरू होणार आहे.
ही सर्व परिस्थिती पाहता आज पांडुरंग वगळता इतर कारखान्याचे सभासद ऊस कुठे पाठवायचा या विवंचनेत आहेत अशा परिस्थितीत आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी कोणत्याही कारखान्याचे असले तरीही शेतकरी म्हणून त्यांना पांडुरंगकडून न्याय दिला जाईल व त्यांचा ऊस नेला जाईल अशी भूमिका जाहीर केली ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यावेळी बोलताना म्हणाले .
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी वेळोवेळी आम्ही ऊसदर आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर ऊस दराची कोंडी फोडण्याचे काम केले. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार त्यांच्याकडे चर्चेला जायचो आणि ते मार्ग काढत असत. आज आ. प्रशांत परिचारक यांनी देखील अशाच प्रकारची भूमिका घेत स्वर्गीय सुधाकरपंत यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे आणि शेतकऱ्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन आधार देण्याचे काम केल्याबद्दल मी त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर आभार मानतो. येत्या काळात उसाला दर देऊन आणखी शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे टाकावेत अशी देखील यानिमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो असेही पुढे बोलताना तानाजी बागल म्हणाले.