शासनाच्या थकहमीचा फायदा सभासदांना होणार – कल्याणराव काळे
सहकार शिरोमणी कारखान्याची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन संपन्न
चंद्रभागानगर,भाळवणी,ता पंढरपूर, जि सोलापूर 30/09/2021- मागील दोन गळीत हंगामामध्ये राज्य सहकारी बँक व इतर बँकाकडून कर्ज मिळण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने कारखान्याच्या संचालक मंडळाने स्वत:च्या मालमत्तेवर कर्ज उभारुन कारखाना चालविला. साखरेच्या दरातील तफावत, कमी गाळप यामुळे अडचणी आल्या मात्र चालु गळीत हंगामामध्ये शासनाकडून मिळालेल्या थकहमीचा फायदा घेत कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून सभासदांचे सर्व देणी देण्यासाठी संचालक मंडळ बांधिल आहे, असे प्रतिपादन स.शि.वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.
कारखान्याच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या 30 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काळे बोलत होते. यंदा कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीने पुर्ण नियोजन झाले असून, तोडणी वाहतुकदार यांचे करार पुर्ण होवून त्यांना ॲडव्हान्स रक्कम देण्यात आली आहे. मशिनरी दुरुस्तीचे काम अंतिम टप्यात आले असून, कामगारांचे पगार नियमित होत आहेत. शासना कडून महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कर्जास थकहमी मिळाली आहे. लवकरच राज्य सहकारी बँकेकडून कर्ज उपलब्ध झाल्यानंतर एफआरपी ची उर्वरीत रक्कम सभासदांना वाटप करण्यात येईल. मागील दोन वर्षात साखरेला उठाव नसल्याने साखर कमी किंमतीत विकावी लागली तो व्याजाचा भुर्दड कारखान्यास बसला आहे. यंदा राज्य शासनाने राज्य सहकारी बँकांना कारखानदारीबाबत सकारात्मक भुमिका ठेवुन, कर्ज वाटप करण्याच्या सुचना केल्या आहेत.त्याचा फायदा कारखानदारी साठी होणार आहे.
सध्या साखरेच्या दरामध्ये उठाव झाला असून,हा दर कायम राहिल्यास सभासदांना त्याचा फायदा होईल असा आशावादही काळे यांनी केला. यंदा गळीत हंगाम लवकर सुरु करुन, 5 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.
सभेच्या सुरुवातील कारखाना कार्यस्थळावरील संस्थापक स्व.वसंतदादा काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. जेष्ठ सभासद बाळासाहेब भोसले यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी श्रध्दांजली ठराव मांडला. संचालक सुधाकर कवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विषय पत्रिकेतील सर्व विषय प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे यांनी वाचन केले त्यास ऑनलाईन हजर असलेल्या सभासदांनी मंजुरी दिली.

कारखान्याचे संचालक दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी घरगुती व व्यावसायिक वापराच्या साखरेचे दर वेगवेगळे ठेवण्यात यावेत अशी मागणी राज्य व केंद्र सरकारकडे केली होती. राज्य सरकारने या मागणीची दखल घेत केंद्राकडे तशी शिफारस केली आहे. त्याबद्दल दिनकर चव्हाण यांचा कारखान्याच्यावतीने चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व संचालक, नुतन कार्यकारी संचालक झुंझार आसबे,सर्व खातेप्रमुख,उपखातेप्रमुख ऑनलाईन सभासद उपस्थित होते.