विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी मारली बाजी

विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी मारली बाजी Samadhan Awtade won the Assembly by-election

पंढरपूर, 02/05/2021- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला.आवताडे,भालके यांच्यासह १९ उमेदवार रिंगणात होते. पण भालके व आवताडे यांच्यातच मुख्य लढत झाली .

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक झाली.पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची ही निवडणूक असली तरी राज्यातील महाविकास आघाडी व भाजप महायुतीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. कोरोनाची पार्श्वभूमीवर होत असलेल्या आणि संचारबंदी असूनही राज्यपातळीवरच्या नेतेमंडळींचा प्रचारासाठी मोठा राबता होता. पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ आरोप प्रत्यारोपांनी गाजला होता.पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत साखर कारखान्याच्या कामगारांचे व शेतकर्‍यांचे प्रश्न ,वीज तोडणी प्रश्नांमुळे हे विषय विरोधकांनी उचलून धरल्याने राज्य पातळीवर गेले.यामुळे मतदार नेमका कौल कोणाला देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

एकंदरीत 38 पैकी 19 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर समाधान आवताडे यांनी 1 हजार मतांची आघाडी घेतली होती .त्यांचा स्वतःचा हक्काच्या असलेल्या मंगळवेढा भागाची मतमोजणी बाकी असताना आवताडे यांचा विजय होणार हे जवळपास नक्की झाले होते.मंगळवेढ्याची मतमोजणी 20 ते 38 या फेरींमध्ये झाली. तो भाग आवताडेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे 19 व्या फेरीनंतरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं. आवताडे यांच्या विजयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर तालुक्यात भारत भालके यांना मागच्या निवडणुकीत मोठी आघाडी मिळाली होती. मात्र आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ यांना नागरिकांनी त्या प्रमाणात साथ दिली नसल्याचं तर आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नाला यश दिसून आले.

भाजपकडून समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आमदार प्रशांत परिचारक,श्रीकांत देशमुख,आमदार विजयकुमार देशमुख,आमदार सुभाष देशमुख,खासदार सिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, उमेश परिचारक, प्रणव परिचारक,आमदार गोपिचंद पडळकर,माजी आमदार बाळा भेगडे,माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील,सदाभाऊ खोत यांच्यासह राज्य पातळी वरील अनेक नेते आले होते तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील,आमदार रोहीत पवार, कल्याणराव काळे,आमदार अमोल मिटकरी,मंत्री धनंजय मुंडे,राजेंद्र पवार,आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, शिवसेनेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्री आले होते.

  जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई असल्याचा प्रचार करण्यात आला मात्र मतदारांनी शांतपणे विचार करत निर्णय घेतला आणि भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना आमदार होण्यासाठी संधी दिली. यात भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3733 मतांनी पराभव करत विजय मिळविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: