नदीपात्रात कोसळली कार: एक मृतदेह आढळला; अपघात की घातपात?


हायलाइट्स:

  • शहानूर नदीपात्रात कार कोसळली
  • कारमध्ये आढळला एक मृतदेह
  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू

अमरावती : दर्यापूर तालुक्यात भामोद येथील शहानूर नदीपात्रात एक कार कोसळल्याचे आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत तातडीने महसूल विभाग व येवदा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं. या घटनेत हरियाणामधील सोनीपत येथील अमित नेहरा (वय ३३) यांचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर व पोलीस निरीक्षक मारुती नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम आज दुपारी २ वाजता घटनास्थळी दाखल झाली. टीममधील सर्व सदस्यांनी घटनास्थळाची सर्वप्रथम पाहणी केली.

मिरज दंगल : शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा

रेस्क्यू टीममधील गोताखोर यांनी पाण्यात उतरून कारमध्ये किती इसम अडकले आहेत, याची पाहणी केली. पाण्याला वेग असल्यामुळे गोटाखोर यांना पाण्यामध्ये एका जागेवर थांबता येत नव्हते. शोध व बचाव पथकातील सदस्यांनी कारच्या चेचिसला रोप बांधून ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने कार काठावर आणण्याचा प्रयत्न केला. कार पाण्यामध्ये दोन चाकांवर जागीच उभी झाली. यावेळी जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्यांनी कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र चारही बाजूंनी कारचं मोठं नुकसान झालं असल्यामुळे दरवाजे उघडले नाहीत.

शोध पथकातील जवानांनी खिडकीच्या काचा फोडून खिडकीतून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्या कारणामुळे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्यामुळे क्रेनच्या सहाय्याने कार पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात आली. सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान मृतदेह कारच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शोध व बचाव पथकाने पोलिसांच्या हवाली केला.

दरम्यान, ही कार नदीपात्रात कशी कोसळली याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र स्थानिकांकडून या घटनेत घातपाताचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस तपासानंतरच या दुर्घटनेमागील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: