मनीष गुप्ता हत्या : रामगढताल पोलीस हद्दीत आणखी एका तरुणाचा मारहाणीनंतर मृत्यू
हायलाइट्स:
- मनीष गुप्ता यांचा पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीनंतर मृत्यू
- आणखीन एका तरुणाचा मारहाणीनंतर मृत्यू
- नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण
मनीष गुप्ता हत्या प्रकरण अद्यापही निवळलेलं नाही. गुप्ता यांच्या मृत्यूनंतर केवळ ७२ तासांच्या आत याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणखीन एका तरुणाचा मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचं समोर येतंय. रामगढताल पोलीस स्टेशनपासून केवळ २०० मीटर अंतरावर एका दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा काही तरुणांकडून मारहाण करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला आहे. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
काय घडलं नेमकं?
या घटनेतील मृताचं नाव मनीष प्रजापती असल्याचं समजतंय. २५ वर्षीय मनीष ‘वरदानी मॉडल शॉप’मध्ये कॅन्टीनवर कर्मचारी म्हणून काम करत होता. गुरुवारी रात्री जवळपास ८.०० वाजल्याच्या सुमारास इथं काही तरुण दारू पिण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी मनीषला ऑर्डर दिली. मात्र, ऑर्डर मिळण्यासाठी उशीर झाल्याचं सांगत ग्राहकांनी मनीषला फैलावर घेतलं. त्यांच्यात वाद सुरू असताना रघू नावाचा आणखी एक कर्मचारी हा वाद थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, जवळपास सहा तरुणांनी दोन्ही कर्मचारी तरुणांना मारहाण सुरू केली.
मनीष आणि रघू दोघांनाही जबर मारहाण केल्यानंतर ते गंभीररित्या जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी कर्मचाऱ्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. मात्र, डॉक्टरांकडून मनीषला मृत घोषित करण्यात आलं. तर रघुची परिस्थिती चिंताजनक आहे.
पोलीस निरीक्षक के के राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलंय.