राज ठाकरेंवरील टीकेला मनसेचं उत्तर; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याची गुलाब चक्रीवादळाशी तुलना
हायलाइट्स:
- गुलाबराव पाटील यांना मनसेचं जोरदार उत्तर
- मनसेचे नेते अमेय खोपकर यांचं खोचक ट्वीट
- संवेदनाहीन ‘गुलाब’ चक्रीवादळाशी केली मंत्र्याची तुलना
राज्यात घोंगावलेलं गुलाब चक्रीवादळ व त्यानंतर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत दिली जावी, अशी मागणी विरोधकांकडून सरकारला केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावर गुलाबराव पाटील यांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली होती. ‘राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. मागणी करणं सोपं आहे, मात्र निर्णय पंचनाम्यानंतर होईल. परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर केला जाईल. राज ठाकरे यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. कुणीही राजकारण करू नये,’ असं पाटील म्हणाले होते.
वाचा: ठेकेदारांनी तुम्हाला न विचारता रस्ते बांधले का?; अमित ठाकरेंचा शिवसेनेला सवाल
गुलाबराव पाटलांच्या या टीकेला मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून अत्यंत बोचऱ्या शब्दांत उत्तर दिलं आहे. ‘गुलाब चक्रीवादळामुळं समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते. राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे, पण संवेदनाहीन ‘गुलाब’ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ असलेले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे,’ अशी टीका खोपकर यांनी केली आहे.
वाचा: भयंकर घटनेने पुणे हादरले! पैसे परत मागितले म्हणून मित्राला पेट्रोल टाकून जाळले