Video : पंचांनी बाद दिलं नसतानाही सोडलं मैदान; पूनमच्या खिलाडूवृत्तीचं होतंय कौतुक
भारताच्या डावातील ८१ वे षटक सुरू होते आणि ऑस्ट्रेलियाकडून सोफी मॉलिनेक्स गोलंदाजी करत होती. मॉलिनेक्सचा एक चेंडू बॅटला लागून विकेटच्या मागे उभ्या असलेल्या एलिसा हिलीच्या हातात गेला. ऑस्ट्रेलियन संघाने सोफीसह झेलबाद असल्याचे अपील केले. पंचांनी अजूनपर्यंत निर्णय दिला नव्हता, पण असे असूनही पूनम राऊतने क्रीज सोडली. या सामन्यात डीआरएस प्रणाली वापरली जात नाहीय, अशा परिस्थितीत पंचांनी बाद दिले नसल्याने पूनम क्रीजवर राहू शकली असती, पण तिने खिलाडूवृत्ती दाखवत मैदान सोडले.
पूनमने या खेळीत १६५ चेंडूंचा सामना करत ३६ धावा केल्या. पूनम आणि स्मृती मंधाना यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांच्या या कसोटी सामन्यात DRS चा वापर केला जात नाहीय. ३१ वर्षीय पूनमच्या या प्रामाणिकपणाचे क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुक केले आहे. ‘स्पिरिट ऑफ द गेम’ असं एका चाहत्याने ट्विट केले, तर दुसऱ्या एका चाहत्याने सचिन तेंडुलकरला टॅग केले आणि लिहिले आहे की, ‘लेडी सचिन तेंडुलकरला पाहत आहे.’ दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट केले, ‘मला सचिन सरांची आठवण झाली.’