सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी
सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी

सोलापूर,दिनांक ३०/०९/२०२१ – वडाळा येथील डॉक्टरांना खंडणीच्या उददेशाने अपहरण करून लुटलेल्या सात आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या चार दिवसात मुसक्या आवळण्यात एल.सी.बी.ला यश मिळाले.दिनांक २१/०९/२०२१ रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास यातील फिर्यादी डॉ.अनिल व्यंकटेश कुलकर्णी , वय ४७ व्यवसाय वैद्यकीय सेवा व इंडीयन ऑईल पेट्रोल पंप वडाळा रा.वडाळा ता.उत्तर सोलापूर, सध्या रा .५६५ उत्तर कसबा सोलापूर हे त्यांची वेरना गाडी क्रमांक एमएच १३ – बीएन ९३६७ मधूल मौजे वडाळा ते सोलापूरकडे जात असताना बीबी दारफळ ते कोंडी गावाचे रस्त्याचे दरम्यान एम.आय.डी.सी च्या जवळ असलेल्या क्रॉस रोडवर आलेनंतर अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचे ताब्यातील इनोव्हा गाडी आडवी लावुन फिर्यादी यांना गावठी बंदुकीचा धाक दाखवुन कोयत्याने ,काठी व हॉकी स्टीकने मारहाण करून जखमी करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवुन त्यांचे अपहरण करून १ कोटीची खंडणीची मागणी करून त्यांना मोहोळ,पंढरपूर , टेंभुर्णी , इंदापुर ,बारामती,जेजूरी, सासवड मार्गे वारजे – माळवाडी पुणे येथे नेऊन त्यांचेकडील पेट्रोल पंपाची जमा असलेली ५ लाख ७० हजार ४२० रूपये रोख रक्कम तसेच फिर्यादी यांचे खिशातील १८ हजार रूपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८८ हजार ४२० रु. जबरदस्तीने काढुन घेवून यातील फिर्यादीस वारजे माळवाडी, पुणे येथे ढकलुन दिले म्हणुन वगैरे मजुकरची फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल आहे .सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते ,अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी दिल्या . भेटी दरम्यान पोलीस अधिक्षक ,अपर पोलीस अधिक्षक यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या . त्यानुसार गुन्हे शाखेचे पोनि सर्जेराव पाटील यांनी सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथक नेमून पथकास यातील फिर्यादीस वारजे माळवाडी पुणे येथे सोडले असून सदर गुन्हयात गावांतील एखादया व्यक्तीचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून त्या दृष्टिकोनातून तपास करून गांवातील व पुणे भागातील अशा पध्दतीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करून गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या .
त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडील सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथक सदर गुन्हयाचे तपासकामी पुणे शहरात असताना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा हा वडगांव , सिंहगड रोड , पानमळा पुणे येथील गुन्हेगारांनी केल्याचे माहिती मिळाल्याने ०५ आरोपीतांना पुण्यातुन ताब्यात घेवून त्यांचेकडे स्वतंत्ररित्या विचारपूस करता त्यांपैकी ०१ आरोपीने सांगितले की ,त्याचा मामाचा मुलगा हा मौजे वडाळा ता . उत्तर सोलापूर येथे राहवयास असून त्यास मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी मोठी आसामी असलेल्या व्यक्तीस लुटण्याचे काम बघण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मामाच्या मुलाने सांगितले की ,मौजे वडाळा गावात एक डॉक्टर असून त्यांचा पेट्रोलपंप व दवाखाना आहे ,त्यांचेकडे मोठया प्रमाणात पैसे असून ते दरदोज पेट्रोल पंम्पातील व दवाखान्या तील जमा झालेली रक्कम त्यांचेकडील वेरना कारमधून सोलापूरला जात असतात त्यांचे किडनँपिंग केले तर ते आपल्याला एक दोन कोटी रूपये नक्की देईल अशी माहिती सांगितली होती . तेंव्हा मामाचे मुलास लुटण्याचे काम कधी करावयाचे आहे ते तु मला दोन चार दिवस अगोदर सांग असे आरोपीने सांगितले होते .
त्याप्रमाणे वडाळा येथील आरोपीच्या मामाच्या मुलाने नियोजन करून पुण्यातील आरोपीतांना तीन दिवस अगोदर बोलावून घेतल्याने ते सर्वजण इनोव्हा गाडीने सोलापूरात येवुन सोलापुरातील हॉटेल अँबेसिडर येथे थांबले होते . दरम्यान आरोपीच्या मामाचा मुलगा व त्याचा एक मित्र असे सदर लॉजमध्ये गुन्हयाचे नियोजन करून दिनांक २१/०९/२०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास डॉक्टर यांना किडनँपिंग करून लुटण्याचे ठरले . दिनांक २१/०९/२०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास ठरल्याप्रमाणे मामाच्या मुलाने डॉक्टर गांवातून निघाले असून मी त्यांचे मागे मोटार सायकलवर असल्याचे सांगितले .त्यानंतर आरोपीतांनी डॉक्टरची वेरना गाडीस इनोव्हा गाडीने आडवून डॉक्टरांना त्यांचे कारमधून बाहेर काढून इनोव्हा गाडीमध्ये घातले . तेव्हा इनोव्हा मधील एका आरोपीने डॉक्टरांची वेरना गाडी ताब्यात घेवून त्यानंतर आरोपींनी डॉक्टरांना घेवून बीबीदारफळ , मोहोळ ,पंढरपूर ,टेंभूर्णी ,इंदापूर , बारामती,जेजूरी ,सासवड मार्गे वारजे माळवाडी ब्रिज पुणे येथे नेऊन सोडल्याचे सांगुन त्यासाठी मामाच्या मुलाने व त्याचे मित्राने मदत केल्याचे सांगुन चोरलेले पैसे आपसात वाटुन घेतल्याचे सांगितले .
न्यायालयाने अटक आरोपीताची गुन्हयाचे तपास कामी ०४ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि/बंडगर, सोलापुर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत . अटक आरोपीपैकी मुख्य आरोपीता विरुध्द हवेली पोलीस ठाणे ,पुणे येथे गंभीर गुन्हे दाखल असुन इतर दोन आरोपीता विरूध्द हवेली पोलीस ठाणे गु.र.न. ३६६/२०१२ भादवि कलम ३०२,१० ९ , येथे गुन्हे दाखल आहेत . सदर गुन्हयातील आरोपीतांकडुन चोरलेले रोख रक्कमेपैकी २ लाख ५० हजार रोख रक्कम हस्तगत केली असून , गुन्हयात वापरलेले इनोव्हा कार नंबर एमएच ४२ एन ४५५४ व हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटार सायकल एमएच १३ डीजे ८५८७ व आरोपीतांचे एकूण ०७ मोबाईल असा एकूण ८ लाख १३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत .
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते , अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सपोनि रवींद्र मांजरे , पोलीस अंमलदार नारायण गोलेकर,धनाजी गाडे ,मोहन मनसावाले , अक्षय दळवी ,चालक समीर शेख यांनी बजावली आहे .