प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची रेल्वेखाली आत्महत्या; सततच्या लॉकडाऊनमुळे…


हायलाइट्स:

  • हॉटेल व्यावसायिक सचिन सर्जेराव पवार यांची आत्महत्या.
  • पवार हे सांगलीतील प्रसिद्ध शुभम गार्डन हॉटेलचे मालक.
  • आर्थिक विवंचनेतून रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवले.

सांगली:सांगली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने कर्जबाजारीपणा आणि नैराश्यातून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंकली गावाजवळ घडली. सचिन सर्जेराव पवार (वय ४५, रा. गोविंदनगर, सांगली) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. आत्महत्येच्या या घटनेनं सांगलीतील हॉटेल व्यावसायिकांवर शोककळा पसरली आहे. ( Sachin Sarjerao Pawar Suicide News )

वाचा:मनी लाँडरिंग प्रकरण: अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोर्टाचे वॉरंट जारी

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून सचिन पवार यांचे सांगली – कोल्हापूर रोडवरील फळ मार्केट जवळ शुभम गार्डन हे प्रसिद्ध हॉटेल आहे. गेल्या दोन वर्षांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे ते आर्थिक विवंचनेत होते. कर्जाचा बोजा वाढत असल्याने ते चिंतेत होते. बँकांचे हप्ते, कामगारांचा पगार, घरखर्च या सगळ्यांची जुळवाजुळव करताना त्यांना पुन्हा कर्ज काढावे लागत होते. याच विवंचनेतून त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंकली गावाजवळ रेल्वेखाली उडी घेतली. रेल्वे चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याने तात्काळ रेल्वे थांबवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पवार यांना उपचारासाठी रेल्वेतूनच मिरजेत दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वाचा: राज्यात नवरात्रोत्सवामध्ये गरबा घुमणार, पण…; टोपे यांची मोठी घोषणा

या घटनेनंतर मिरज लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पवार यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याने लॉकडाऊन काळात हॉटेल व्यवसायावर झालेले परिणाम स्पष्ट होत आहेत. सर्वच हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने वर्षभर वीज बिलांसह इतर करांमध्ये सवलत द्यावी. तसेच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.

वाचा: मुंबईतील धार्मिक स्थळांसाठी ‘ही’ महत्त्वाची अट; पालिकेचा आदेश जारीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: