सर्वतोभद्र प्रथमाचार्य शांतीसागर

सर्वतोभद्र प्रथमाचार्य शांतीसागर

श्रेष्ठ पुरुषांची चरित्रं मानवाला प्रेरणा देतात. त्रेसष्ट शलाका पुरुषांची चरित्रं सामान्य माणसाच्या शक्तीला, भक्तीला अर्थ प्राप्त करुन देतात. २० व्या शतकातील प्रथमाचार्य शांतीसागर महाराजाचं चरित्र हे केवळ एका दिगंबर जैन साधूचं नाही तर ते एका आदर्श शिक्षकाचं, खऱ्या गुरुचं आणि विचारवंत समाजसुधारकाचं चरित्र आहे. त्यांच्या चरित्राच्या प्रभावाने अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यांच्या चरित्राच्या प्रभावाने वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या सारखा अलौकिक बुध्दीमत्तेचा आचारवंत समाजसुधारक जैन समाजाला लाभला, आणि दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दलाच्या सेवापिठावर तळपून गेला.प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना घराघरात,मनामनात पोहोचवण्याचं महत्कार्य, वीराचार्य पराक्रम जैन समाजाला कधीच विसरता येणार नाही.

गुरुकुल शिक्षणप्रणालीद्वारे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात विद्येची व संस्काराची बीजे पेरलेल्या गुरुदेव समंतभद्र महाराजाना प्रथमाचार्यांनी १९३३ मध्ये ब्यावरला क्षुल्लक पदाची दीक्षा देऊन त्यांना गुरुकुलाचे पवित्र कार्य करण्यास अनुमती दिली. प्रथमाचार्य शांतीसागर हे केवळ दिगंबर साधू नव्हते तर त्याचबरोबर ते सृजनशील, प्रतिभावंत, आचारवंत समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ विचारवंतही होते.

प्रथमाचार्यांच्या विचारात आणि आचारात संकुचितपणाला थारा नव्हता. जात, पात, पंथ आणि वर्ण या भेदा पलिकडे पोहचलेले त्यांचे व्यक्तीमत्व भारतीय संस्कृतीचे भूषण होते. त्यांच्या चरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर ‘मानवतेची विचारधारा बळकट करणारा महापुरुष आपल्या समोर अवतीर्ण होतो. संयम आणि आत्मचिंतन या दोन बाबींवर त्यांनी भर दिला. माणसानं आपलं मन ताब्यात ठेवावं, स्वैर विचाराला लगाम घालावं, संयमीत जीवनातच खरे सुख आहे हा त्यांच्या जीवन चरित्राचा आणि उपदेशाचा मुख्य आधार आहे.

अहिंसा हेच तत्वज्ञान विश्वाचं कल्याण करु शकतं या विचाराचा त्यांनी भारतभर प्रचार व प्रसार केला. तीर्थंकर प्रणीत आगमावर श्रध्दा ठेवून जगावं हा त्यांचा आग्रही विचार नव्या पिढीला प्रेरणा देणारा नक्कीच आहे. तरच धर्म, तत्वज्ञान व संस्कृती टिकेल ही त्यांची विचारधारा जैन व जैनेतर समाजातील सर्व घटकांनी लक्षात घेतली पाहिजे.

प्रथमाचार्य शांतीसागर महाराजानी स्व.दि. ब.आण्णासाहेब लठ्ठे यांच्या करवी करवीर छत्रपतीकडून बालविवाह प्रतिबंधक कायदा करवून घेतला.चांगला गुळ होण्यासाठी अज्ञानाने बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा त्यांनी बंद करायला भाग पाडले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अस्पृश्योध्दार व बहुजन समाजाचे शिक्षण कार्याचे कौतुक करुन या कार्याला आशीर्वाद दिला. प्रथमाचार्यांच्या उपदेशाने अनेकांनी मद्य व मांस भक्षण बंद करुन शाकाहारी जीवनशैली अंगिकारली. विविध धर्मातील लोक शाकाहारी बनले. जैन आगम साहित्याचे संरक्षण करण्याचे त्यांचे काम ऐतिहासिक आहे. जैन मंदीरं आणि मूर्त्यांचे रक्षण करण्याची प्रेरणा ही त्यांचीच. धर्मबाह्य रुढी व मिथ्या दैवतांकडे वळलेल्या जैन समाजाला आचार्यश्रींनी सम्यकत्वाची शिकवण दिली. जे उदात्त व चांगले आहे त्याचे रक्षण करा, जर ते क्षीण झाले असेल तर त्याचं पुनर्जीवन करा हा विधायक विचार त्यांनी जैन समाजाला दिला.

दिगंबर साधू ही केवळ नमस्काराची ठिकाणं नाहीत, ते चिंतन व मननाचे विषय आहेत याची जाणीव आचाश्रींच्या कार्यातून, तपश्चर्येतून झाल्यावाचून रहात नाही एवढं सामर्थ्य त्यांच्या निर्दोष चारित्र्यात, तपस्येत हमखास आहे. जैन समाजाच्या तरुण पिढीला याचं भान यावं म्हणून त्यांनी आचार्यश्रींची २७ वी पुण्यतिथी सार्वजनिक स्वरुपात साजरी करण्याची संकल्पना वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी मांडली आणि त्याचा प्रारंभही १९८२ मध्ये समडोळीतून झाला.समडोळी येथेही चतुःसंघाकडून त्यांना आचार्य पद १९२४ मध्ये बहाल करण्यात आले.आता समडोळीच यंदा त्यांचा आचार्य पदारोहण शताद्बी सोहळा समस्त समडोळीकर आणि दक्षिण भारत जैन सभेच्या सहकार्याने भक्तीभावाने साजरा होतोय समडोळीचे श्रमण संस्कृतीवर अनंत उपकार आहेत. शंभर वर्षांपूर्वी याच भूमीत शालिनी मळ्यात आचार्यश्रींनी तपश्चर्या केली होती. जैन धर्म परंपरेत जे महत्त्व अयोध्येला, सम्मेदगिरीला तेवढंच महत्त्व समडोळीला देणं क्रमप्राप्त आहे.ही भूमी संतांची, कष्टकरी शेतकऱ्यांची, तीर्थंकर गौरव करणाऱ्या संवेदनशील माणसांची आहे.या भूमीत त्यागी परंपरा आहे. श्री. १०८ नेमीसागर (नेमाण्णा खोत) श्री १०५ ऐल्लक यशोधर (आदाप्पा बेले) श्री. १०८ कुंथुसागर (भुजगोंडा नरसगोंडा) श्री. १०८ अपूर्वसागर (महावीर नेमगोंडा) श्री १०८ सुपार्श्वसागर (कुमगोंडा नेमगोंडा) श्री १०५ चंद्रमती (सुशिला शामगोंडा) श्री १०५ सौरभमती (उज्ज्वला चव्हाण) श्री १०५ वात्सल्यमती (आशाराणी पाटील) आणि श्री १०८ शांतीसागर (दादासाहेब श्रीपाल पाटील) इ.

मुनी व माताजींच्या पावन सान्निध्यात जैन व जैनेतर समाज पुलकित झाला आहे. येथील भ.आदिनाथ,भ. शांतीनाथ व भ.महावीर जिन मंदीरांचा इतिहास ओजस्वी आहे.आदिगिरीवरील प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अखंड भारत वर्षाला शांतीचा संदेश देत आहे.वीर सेवा दलाच्या अनेक सैनिकांनी दीक्षा घेतली याचे श्रेय प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांच्या चरित्राने प्रभावित होऊन पूर्णवेळ जैन समाजाला वाहून घेतलेल्या वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांना जाते.

प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना अनेक उपसर्ग झाले परंतु त्यांचा त्यांच्या तपश्चर्येवर बिलकुल परिणाम झाला नाही. ते उपसर्ग विजेता झाले.

आहारावेळी गरम दुधाने हात भाजला त्यावेळी आहारदात्या भगिनीस क्षमा केली. छिद्दी ब्राह्मणाने शस्त्राने हल्ला केला त्याला सोडायला लावले,सांगली जैन बोर्डिंगमध्ये एका विद्यार्थ्याने त्यांच्यासमोर उध्दटपणे वागल्यानंतर त्याला बोर्डिंगमधून काढल्यानंतर त्याला पुन्हा घ्यायला लावले, सोनागिरी व मुक्तागिरी पर्वतावर आणि शिखरजी विहारात वाघांचा,ध्यानमग्न असताना मुंग्यांनी चावा घेतला,कोगनोळीला वेड्या माणसाचा,तरुणपणी शेतात,शेडबाळ व कोण्णूरला सर्पाचा,अकलूजला हरिजन मंदीर प्रवेश प्रकरणी ११०५ दिवस अन्नत्याग असे अनेक उपसर्ग त्यांनी शांतपणे सहन केले.१९१४ पासून १९५५ पर्यंत ४३चातुर्मास, उत्तूर पासून उत्तर भारत असा ३२ हजार किमीचा विहार करुन सर्वसामान्य लोकांना समजेल अशा सोप्या सुबोध कन्नड व मराठीत उपदेश करुन जैन धर्म प्रचार केला.त्यांचा अंतीम उपदेश जो अनेक जिन मंदिरात भिंतीवर संगमरवरी पाषाणात कोरला आहे तो तर आगमनाचा सारच आहे.

अकलूज प्रकरणात जैन धर्म हा हिंदू धर्माची शाखा नसून तो स्वतंत्र धर्म आहे हे शासनाकडून कबूल करुन घेतले. कोर्टाने तसा निकालही दिला. याचे श्रेय प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांनाच जाते.

अतुलनीय धैर्य, निग्रहाने दडपणाला बळी न पडता दिगंबर मुनी परंपरेचे पुनर्जीवन आणि श्रुतसंरक्षण हे ऐतिहासिक कार्य प्रथमाचार्य शांतीसागर यांनी केले आहे.

त्यांनी २०व्या शतकात जैन धर्माची उत्कृष्ट घडी बसविली. कठोर व निर्दोष आचरणातून भारतालाच नव्हे तर जगाला दिगंबर जैन साधू कसे असतात हे दाखवून दिले. त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने जैन समाजात सदवर्तनाची क्रांती केली आहे. अनिष्ट रुढी परंपरेत अडकलेल्या जैन समाजाला योग्य दिशा देताना धर्मसंस्कार, पूजा-अर्चा यांची शास्त्रोक्त ओळख करुन दिली. खरा जैन धर्म समजावून सांगितला.विधी विधाने, पंचकल्याणक पूजा कशी करायची हे सांगितलं. १९१४ च्या उत्तूर चातुर्मास समयी जैन साधूंचा आहार विधी समजावून दिला. आहारानंतर कमंडलूमध्ये एक रुपयाचे नाणे आहारदात्याने टाकायची पध्दत मोडून काढली.दिगंबर जैन साधूंची विहारबंदी उठवायला शासनास भाग पाडले.स्त्री – पुरुष समता तत्त्वाचा अंगीकार केला. जैनांना स्वाभिमान शिकवला.जैन समाजातील गट तट संपवून समाज एकसंध केला. मिथ्यात्व नष्ट करुन जैन समाजाला सम्यकत्वाची कास धरायला लावली. उत्तर व दक्षिण भारतातील जैन व जैनेतर समाज जागृत केला. त्यांचे प्रबोधन करुन अहिंसेचा प्रचार व प्रसार केला. गरीब मुलांसाठी अनाथाश्रम काढले.

आत्मचिंतनातून आत्मकल्याण या सूत्राद्वारे १५दिगंबर साधू, ३ आर्यिका, ८ क्षुल्लिका, ८ क्षुल्लक आणि २८ ब्रम्हचारी व ३२ प्रतिमा धारकांना दीक्षा व प्रेरणा दिली. मुनी संघ स्थापन करुन व्यक्तीगत व सामाजिक पातळीवर जैन समाजाला धर्मप्रेरीत केले. श्रावक-श्राविका, मुनी – आर्यिका यांच्या जीवनात नियमबध्दता आणली.

अनेक जैन मंदिरांचे नवनिर्माण व जिर्णोद्धार केले. लोकांच्या मनातील शस्त्राचे कारखाने बंद करुन शास्त्राचे महत्त्व सांगितले.

प्रचंड सहनशक्ती, माणसं नावानिशी ओळखणं, धर्म ग्रंथातील श्लोकांचे अचूक क्रमांक व ग्रंथांची नावे सांगण्यात ते पारंगत होते.व्यसनी माणसाला साधू बनवण्याचा पराक्रम हा प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांचाच आहे.धवला, जयधवला व महाधवला हे आगम ग्रंथ ताडपत्रीवरुन ताम्रपटावर कोरले.आजही ते मुंबई येथील काळबादेवीच्या भ.पार्श्वनाथ जिन मंदीर व फलटणच्या भ.चंद्रप्रभू मंदिरात सुरक्षित आहेत.

भगवान देशभूषण व कुलभूषण निर्वाण भूमी सिध्दक्षेत्र कुंथलगिरी येथे त्यांनी ८ सप्टेंबर १९५५ रोजी शांत चित्ताने समाधी मरण साधले. त्यांची सल्लेखना झाली त्यावेळी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्तगण उपस्थित होते. त्यांच्या समाधी मरणानंतर आचार्यश्री वीरसागर,आचार्यश्री नेमीसागर, आचार्यश्री पायसागर, आचार्यश्री वर्धमानसागर, आचार्यश्री देशभूषण, आचार्यश्री विमल सागर, आचार्यश्री विद्यानंद, आचार्यश्री अभिनंदनसागर, आचार्यश्री कुशाग्रनंदी, आचार्यश्री कल्पवृक्षनंदी, आचार्यश्री श्रुतसागर, उपाध्याय निर्णयसागर व अनेक आर्यिका यांनी विनयांजली अर्पण करताना प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या निर्दोष आचरणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती राधाकृष्णन, भारताचे माजी कृषी मंत्री पंजाबराव देशमुख,सुप्रिम कोर्ट जज्ज व्यंकटराव अय्यर, मुंबईचे माजी गव्हर्नर हरेकृष्ण मेहताब, बिहारचे माजी गव्हर्नर आर. आर. दिवाकर, मध्यप्रदेशचे माजी गव्हर्नर के. संथनाम, दिल्लीचे कमिशनर ए. डी. पंडीत, पटना हायकोर्ट जज्ज राम लुभाया, आसामचे मुख्यमंत्री बिष्णुराम मेधी, राजस्थानचे मुख्यमंत्री मोहनलाल सुखाडीया,हैदराबादचे गृहमंत्री दिगंबरराव बिंदू,उत्तर प्रदेश विधानसभा उपसभापती हरगोंविद पंत,जम्मू आणि काश्मीरचे अर्थमंत्री जी.एल.डोग्रा,पंजाबचे मुख्यमंत्री भीमसेन सच्चर,देशातील अनेक खासदार आणि आमदार,भारतातील जपानचे माजी राजदूत सिजीराव,इराणचे माजी राजदूत हेकमट, नेपाळचे राजदूत यांचे शोकसंदेश आले होते.हे मोठेपण प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचे जैन धर्माची पताका विश्वभर फडकावणारेच आहे.

वीर सेवा दलाकडून दरवर्षी आचार्यश्रींची पुण्यतिथी सार्वजनिक स्वरुपात साजरी केली जाते.वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी आचार्यश्रींना घराघरात व मनामनात पोहचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. जैन समाजाने आचार्यश्रींच्या विचाराने वाटचाल करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.प्रत्येक जैन घरात,मंदिरात,तीर्थक्षेत्रावर प्रथमाचार्य श्री शांतीसागर महाराजांच्या चरित्राची पारायणं झाली तरच यापुढे जैन समाजाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे एवढे मात्र निश्चित.

समडोळीला वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्यावतीने होणाऱ्या प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास शुभेच्छा.

प्रा.एन.डी.बिरनाळे
सांगली


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading